भारत जोडो यात्रेचा समारोप
श्रीनगर,दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कन्याकुमारीपासून सुरू झालेली कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची बहुचर्चित भारत जोडो यात्रेचा आज जम्मू-काश्मिरमधील श्रीनगरमध्ये भव्य समारोप झाला. 146 दिवसांपासून सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेतून 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून जवळपास 1970 किलोमीटरचा प्रवास करून राहुल गांधी श्रीनगर येथे पोहोचले. काल राहुल गांधी यांनी लाल चौकात तिरंगा फडकावला.
भारत जोडोच्या समारोपाला शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, डीएमके, आरजेडी, जनता दल, सीपीआय, केरळ कॉंग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि जेएमएम या पक्षाचे नेत्यांना समारोपाला निमंत्रित करण्यात आले होते.
भारत जोडो यात्रेचा औपचारिक समारोप समारंभ आज श्रीनगरमधील काँग्रेस मुख्यालयात पार पडला. त्यानंतर शेर-ए-काश्मीर स्टेडियममध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वात एक रॅली आयोजित करण्यात आली होती. बर्फवृष्टी होत असतानाच राहुल गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं, तसंच भाजपा आणि आरएसएसवर निशाणा साधला. भाजपच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात राहुल गांधी यांची ही यात्रा असल्याचे सुरुवातीपासूनचं सांगितलं होतं, हेच त्यांनी आजच्या समारोपाच्या भाषणात अधोरेखित केले. राहुल म्हणाले, भाजपा, आरएसएसचे लोक मला नाव ठेवतात, मी त्यांचे आभार मानतो. ते जेवढं प्रेशर टाकतील, तेवढं मी शिकत राहीन. गांधीजींकडून शिकलो आहे की जगायचं असेल, तर न घाबरता जगा. मी चार दिवस इथे पायी चाललो. मी फक्त हाच विचार केला की, बदला माझ्या पांढऱ्या टी-शर्टचा रंग, लाल करून टाका. पण मी जो विचार केला होता, तेच झालं. जम्मू काश्मीरच्या लोकांनी मला हँड ग्रेनेड दिलं नाही, तर प्रेम दिलं. मोठ्या मनाने प्रेम केलं, आपलं मानलं, प्रेमाने, अश्रूंनी माझं स्वागत केलं.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले,“ही यात्रा निवडणूक जिंकण्यासाठी किंवा काँग्रेस पक्षाला पुढे नेण्यासाठी नाही, तर द्वेषाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी काढण्यात आली आहे. भाजपाने काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवलं आहे, पण आम्ही काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देऊ.”
30 Jan. 2023