तोफखाना दलाचे शत्रूच्या उरात धडकी भरविणाऱ्या सामर्थ्याचे प्रदर्शन
नाशिक , दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देवळाली फिल्ड फायरिंग रेंज येथे झालेल्या तोफखाना प्रात्यक्षिकात भारतीय तोफखाना दलाच्या विविध तोफांनी कित्येक किलोमीटर असणाऱ्या डोंगराच्या कुशीतील लक्षावर अचूक मारा करीत भारतीय तोफखाना दलाच्या युद्ध सज्जतेचे दर्शन घडविले.
भारतीय तोफखाना दलाच्या स्कूल ऑफ आर्टिलरी अर्थात तोफखाना प्रशिक्षण केंद्रामार्फत आयोजित या युद्धसरावा दरम्यान तोफखाना दलातील विविध तोफांबरोबर हेलिकॉप्टर तसेच रॉकेट लॉंचर प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.
युद्धाचा देव अशी तोफखान्याची ओळख असून तोफखान्याला आर्टिलरी इज अ गॉड ऑफ वॉर असे म्हणतात. देवळाली फिल्ड फायरिंग रेंज मधील एरिया रेक्टअँगल एरिया, डायमंड एरिया , बहुला वन एरिया, बहुला टू या विविध लक्षा वर तोफांचा अचूक मारा करण्यात आला .
या तोफखाना प्रात्यक्षिकांमध्ये मॉर्टेर बोफोर्स, हेवीजर रॉकेट लॉन्चर इत्यादींचा सहभाग होता . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शस्त्राच्या संदर्भात आत्मनिर्भर भारत धोरणानुसार भारतीय बनावटीच्या तोफा वज्र , धनुष, ब्राह्मजोस क्षेपणास्त्र , इंडियन फिल्ड आणि लाईट फिल्डगन प्रणाली तसेच पीनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर यांचे प्रात्यक्षिक आजच्या प्रात्यक्षिकाचे प्रमुख वैशिष्ट्य होते .
नाशिक मधील तोफखाना प्रशिक्षण केंद्रात तोफखाना दलातील जवानांना प्रशिक्षण देण्यात येते शत्रूवर विजय मिळविण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, कार्यकुशलता आणि लक्षाचा अचूक भेद या कौशल्यामुळे प्रसिद्ध असलेल्या जोशपूर्ण जवानांनी विविध तोफांची जुळणी करत तोफांचा मारा करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले . यावेळी प्रत्यक्ष युद्धभूमीवर हेलिकॉप्टर चे कार्य डोंगराळ प्रदेशातील लढाईसाठी हेलिकॉप्टर द्वारा तोफांची वाहतूक तसेच युद्धभूमीवर पॅराशुट द्वारे उतरणाऱ्या सैनिकांचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. तोफखाना दलाच्या प्रात्यक्षिकांमध्ये लष्कराचे वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल एस हरी मोहन अय्यर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या प्रात्यक्षिकासाठी भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकारी , जवान, मोजके निमंत्रित नागरिक, प्रसार माध्यम प्रतिनिधींबरोबर भारतीय लष्कराकडून प्रशिक्षित होणाऱ्या शेजारील नेपाळ आफ्रिकन सह मित्र देशांच्या लष्कराचे वरिष्ठ अधिकारी देखील सामील झाले होते.
ML/KA/PGB
29 Jan. 2023