नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील २१ परम वीर चक्र विजेत्यांची नावे अंदमानातील बेटांना देण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी नुकताच घेतला आहे. या यादीमध्ये पुणे येथील परमवीरचक्र विजेते योद्धा राम राघोबा राणे यांचाही समावेश करण्यात आला आहे. राम राघोबा राणे यांचे नाव अंदमानातील एका बेटाला देण्यात आले आहे. १९४८ च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाच्या स्मरणार्थ त्यांना परम वीर चक्र प्रदान करण्यात आले होते.
राम राघोबा राणे हे वयाच्या २२ व्या वर्षी तत्कालिन ब्रिटिश इंडियन आर्मीच्या बॉम्बे इंजिनीयर रेजिमेंटमध्ये दाखल झाले. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी गाजवलेल्या कामगिरीबद्दल त्यांना हवालदार (सार्जंट)पदी बढती मिळाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राणे यांची नियुक्ती बॉम्बे सॅपर्समध्ये करण्यात आली. त्यांना सेकंड लेफ्टनंट हे पद देण्यात आले.
१९४८ च्या भारत- पाक युद्धात राजौरी, नौशेरा परिसरात त्यांनी गाजवलेल्या अतुलनीय शौर्याचा गौरव म्हणून त्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. १९५८ मध्ये ते मेजर म्हणून निवृत्त झाले. त्यानंतर १९५८ ते १९७१ पर्यंत राणे पुनर्नियुक्तीवरील अधिकारी म्हणून सैन्यात कार्यरत राहिले. ११ एप्रिल १९९४ रोजी पुण्यातील सदर्न कमांड रुग्णालयात त्यांचे निधन झाले.