प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात BSF च्या उंट दलात पहिल्यांदाच महिला स्वार
नवी दिल्ली, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रतिवर्षी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या नेत्रदीपक संचलनात देशाच्या सामर्थ्याचे भव्य दर्शन घडते. संरक्षण दलाच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या महिलाशक्तीचे कौशल्य देखील दरवर्षी पहायला मिळते. यावर्षीचा प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात पहिल्यांदाच सीमा सुरक्षा दलाच्या उंट दलात १२ महिला स्वार सहभागी होणार आहेत. बीएसएफची उंट तुकडी 1976 पासून प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होत आहे. यामध्ये यावर्षी पहिल्यांदाच महिला स्वारांना सहभागी होण्याची संधी मिळत आहे.
सोनल, निशा, भगवती, अंबिका, कुसुम, प्रियांका, कौशल्या, काजल, भावना आणि हिना या बीएसएफ उंट दलाच्या 12 महिला स्वार प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथाच्या पारंपारिक मार्गाने विजय चौक ते लाल किल्ल्यापर्यंत कूच करणार आहेत.
कामासाठी आणि औपचारिक कार्यक्रमांसाठी अशा दोन्ही कर्तव्यांसाठी उंट तैनात करण्यासाठी बीएसएफ हे देशातील एकमेव दल आहे. .या उंटांवर बीएसएफचे जवान पाकिस्तानच्या सीमेवर थारच्या वाळवंटात गस्त घालतात.
सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) 240,000 जवानांपैकी सुमारे 8,000 महिला कर्मचारी आहेत ज्यात सुमारे 140 अधिकारी आहेत ज्यात अधीनस्थ अधिकारी देखील आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झिरो लाइन पेट्रोलिंग आणि रात्रीचे निरीक्षण पोस्ट ड्युटी अशा सर्व प्रकारच्या ऑपरेशनल ड्युटींमध्ये महिला तैनात आहेत.
25 Jan. 2023