जुन्या पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी दिला फडणवीसांना छेद
ठाणे, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही असे ठणकावून सांगितले असतानाच आज राज्य कर्माचाऱ्यांसह शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा विचार सुरू असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याने सरकारमधील विसंवाद उघडकीस आला आहे.
विनाअनुदानित शाळा, इंग्रजी माध्यमात २५ टक्के आरक्षण आदींसह विविध प्रश्नांबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. या संदर्भात शिक्षण विभागाकडून अभ्यास केला जात असून, शिक्षकांना सरकारकडून न्याय दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात दिली.शिक्षकांची मते हवी असतील तर जुनी पेन्शन योजना लागू करावी लागेल असे राजकीय गणित मुख्यमंत्र्यानी मांडले आहे मात्र त्यामुळे सरकारची भूमिका नेमकी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिक्षक मतदारसंघाचा आमदार हा शिक्षकच असावा, अशी भूमिका मांडून युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे निवडून येतील, ही काळ्या दगडावरील रेघ आहे, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघातील भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारासाठी ठाण्यात झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. युतीचे निवडणूक प्रमुख व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्याला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार किसन कथोरे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे, महेश चौगुले, बालाजी किणीकर, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, पांडुरंग बरोरा, भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, सचिव संदीप लेले, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे गोपाळ लांडगे, प्रकाश पाटील, नरेश म्हस्के आदींची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांबरोबरच शिक्षक आणि सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले गेले. त्यामुळे भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळाले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिक्षण क्षेत्रावर विशेष लक्ष आहे. वार्षिक परीक्षेच्या काळातील विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण दूर करण्यासाठी त्यांच्याकडून परीक्षा पे चर्चा हा महत्वपूर्ण उपक्रम सुरू आहे.
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या २०१६ मधील निवडणुकीत शिवसेना, शिक्षक परिषद व शिक्षण क्रांती संघटनेची एकत्रित मते १५ हजारांहून अधिक होती. आता आपण सर्व एकत्र आलो आहोत. गेल्या सहा वर्षांत ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षकांसाठी कार्य केले आहे. त्यामुळे त्यांचा विजय हा औपचारिक असून, ती काळ्या दगडावरील रेघ आहे. परंतु, कोणीही गाफील राहू नये, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
विधानसभेत युतीला बहुमत आहे. पण विधान परिषदेत बहुमतासाठी पाच जागांवर होणाऱ्या निवडणुका महत्वाच्या आहेत. या सर्व जागांवर विजय मिळविण्याची संधी आहे. त्यादृष्टीकोनातून युतीच्या कार्यकर्त्यांनी कार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
ML/KA/SL
21 Jan. 2023