डोंबिवलीत आगळ्या वेगळ्या पद्धतीने लग्न सोहळा
कल्याण, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): डोंबिवली : लग्न सोहळा म्हंटला की, नवरा नवरी, वऱ्हाडी मंडळीची लगबग, बँडबाजा वाजंत्री असा सगळा थाटमाट आलाच. पण रविवारी डोंबिवलीत आगळ्या वेगळ्या पद्धतीने लग्न सोहळा पार पडला. नेहमीचा गाजावाजा, शुभ-अशुभ, जात पात, भपका, बडेजाव, खर्चाला फाटा देत हा लग्न सोहळा पार पडला. डाव्या चळवळीतील दोन तरुणांनी तथाकथित परंपरेला बाजूला सारुन केलेलं ते लग्न होतं. डोंबिवलीतील या अनोख्या लग्नाची चर्चा सुरू आहे.
१५ जानेवारी मकरसंक्रांत या दिवशी डोंबिवलीच्या एकता नगरातील समाजमंदिरात अक्षय आणि अक्षताचं लग्न पार पडलं. मंचावर एका बाजूला सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांचा फोटो होता.तर दुसऱ्या बाजूला अक्षय ज्या कम्युनिस्ट पक्षाचं काम करतो त्याचा बॅनर होता. नवरा, नवरी दोघे दोन मोठ्या खुर्च्यांवर बसले होते. नवरदेवाच्या हातात माईक होता. नवरदेवाने चक्क भाषण केलं. त्यानंतर नववधूने भाषण केलं. आणि मग दोघे उभे राहिले. दोघांनी एकमेकांना हार घातले. त्यानंतर त्यांची मित्रमंडळी मागे येऊन उभे राहिली. नवरदेवाने म्हणजे अक्षयने हातात डफ घेतला. अक्षताने गाणं सुरू केलं…Marriage ceremony in Dombivli is done differently
ऐ भगतसिंग तू जिंदा है हर एक लहू के कतरे में..
हर एक लहू के कतरे में, इन्क्लाब के नारे में…
हे गाणं संपल्यानंतर उपस्थितांनी स्टेजवर येऊन या दोघांना सदिच्छा दिल्या. दोघांनीही या अनोख्या लग्नासाठी आई वडिलांची परवानगी मिळवली होती. दोघांचे आई वडीलही उपस्थित होते. गेली दहा वर्षं अक्षय आणि अक्षताचं दोघं डाव्या चळवळीसोबत काम करीत आहेत. डाव्या चळवळीतील दोन तरुणांनी तथाकथित परंपरेला बाजूला सारुन केलेल्या अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
ML/KA/PGB
17 Jan. 2023