नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी….
नागपूर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानपरिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटच्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे दोन्ही उमेदवार रिंगणात राहिल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे.
एकूण पाच उमेदवारांनी आज आपले अर्ज मागे घेतले आहेत त्यात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराचा समावेश आहे. ३० जानेवारी रोजी मतदान होणार असून आता एकूण २२ उमेदवार निवडणूक लढणार आहेत.
आज दुपारी ३ वाजेपर्यंत नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार निळकंठ उईके, अतुल रुईकर, मुकेश पुडके आणि मृत्यंजय सिंह यांनी तसेच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता भाजपाचे नागो गाणार यांच्यासह काँग्रेसचे सुधाकर आडबाले आणि राष्ट्रवादीचे सतीश इटकेलवार हे प्रमुख उमेदवार रिंगणात उरले आहेत, हा मतदारसंघ महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरे गटासाठी सोडला होता, मात्र त्यांच्याच उमेदवाराने माघार घेतली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे दोन्ही उमेदवार रिंगणात राहिल्याने आघाडीची पार बिघाडी झाली आहे.
ML/KA/SL
16 Jan. 2023