जगबुडीच्या प्रदुषणामुळे मगरी मृत्यूच्या विळख्यात
खेड, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगबुडी ही रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मधुन वाहणारी एक जैवविविधता समृद्ध नदी आहे. मगरींचा अधिवास हे या जैवविविधतेतील विशेष आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून खेड शहरालगत वाहणाऱ्या या नदीच्या पात्रात प्रचंड प्रदुषणामुळे मगरींचा जीव गुदमरत आहे. प्रदुषणामुळे गेल्या दोन महिन्यात दोन मगरी मृत झाल्या आहेत.
काल खेड शहरातील मटण मार्केट शेजारी जगबुडी नदी किनाऱ्यावर १० फूट लांबीची एक महाकाय मृत मगर आढळून आल्याची माहिती वन विभागाला मिळाली. यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खेड नगर परिषदेच्या जेसीबी मशिनद्वारे मृत मगर लाकडी सरणावर ठेवत नदी पत्रातच या मृत मगरीची विल्हेवाट लावली. ही मगर अंदाजे 10 वर्षे वयाची असल्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. कचऱ्यामुळे आधीच प्रदूषित झालेल्या नदीपात्रात मृत मगरीची विल्हेवाट लावल्याने स्थानिक जनतेतून वन विभागाला नदी पत्रात होत असलेल्या प्रदूषणाचा विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान शासनाकडून एकीकडे चला जाणूया नदीला हे अभियान राबवून नदीचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न होत असतानाच खेडमध्ये मात्र सद्यस्थितीला प्रदूषित झालेल्या जगबुडी नदी पत्रात मृत मगरीची विल्हेवाट लावण्याच्या वन विभागच्या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली जात
11 Jan 2023