केंद्राकडून हज यात्रेचा VIP कोटा रद्द
नवी दिल्ली, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पवित्र हज यात्रा करू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य मुस्लिम बांधवांसाठी केंद्र सरकारने आज एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुस्लिम धर्मियांसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या पवित्र हज यात्रेसाठी आजवर ठेवला जाणारा व्हीआयपी कोटा आता रद्द करण्यात आला आहे. यामुळे यात्रेला जाण्यासाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या जागाही आपोआप रद्द होऊन सामान्य हज यात्रेकरूंना यात्रेला जाण्याची अधिक संधी मिळणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियानेही जगभरातील देशांसाठी प्रवाशांचा कोटाही कमी केला होता. त्यामुळे गत दोन वर्षांपासून हज यात्रेकरूंच्या संख्येत लक्षणीय घट झाली होती. मात्र आता २०२३ च्या हज यात्रेत कोणत्याही निर्बंधाशिवाय प्रवास करता येणार आहे. त्यामुळे हज यात्रेकरूंच्या संख्येत मोठी वाढ होऊ शकते. यंदा ७० वर्षांवरील यात्रेकरूंनाही हजला जाता येणार आहे.
मुस्लिम धर्मातील पाच कर्तव्यांमध्ये हज यात्रेचा समावेश होतो. आयुष्यात एकदा तरी हज ला जाता यावे अशी प्रत्येक मुस्लिम व्यक्तीची इच्छा असते. सौदा अरेबियातील मक्का शहरातील काबा या जागी हज यात्रेच्या निमित्ताने जगभरातून लाखो पर्यंटक भेट देतात. या प्रचंड गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सौदी अरेबियाकडून दरवर्षी जगभरातील प्रत्येक देशातून किती मुस्लिम यात्रेकरू सहभागी होऊ शकतात याचा कोटा निश्चित केला जातो. त्यामुळे या मर्यादित जागांमध्ये यात्रेसाठी संधी मिळणे हे अतिशय भाग्याचे मानले जाते. आता केंद्राकडून व्हीआयपी कोटा रद्द झाल्यामुळे या जागा सर्वसामान्य मुस्लिम धर्मियांना मिळू शकतात.
11 Jan 2023