या देशात मानवी मृतदेहापासून खत निर्मितीस मान्यता

 या देशात मानवी मृतदेहापासून खत निर्मितीस मान्यता

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मानवी देह नश्वर, मातीमोल असे म्हटले जाते परंतु पारंपरिक रुढींनुसार मृतदेहावर काहीन काही अंतिम संस्कार करण्याचे विधी जगभरातील सर्वच धर्मपंथांत आहेत. अमेरिकेत मानवी मृतदेहाला पूर्णपणे भूमीतत्वात विलिन करण्याची आणि त्यापासून ह्युमन कंपोस्ट खत तयार करण्याची नवीन पद्धत सुरू झाली आहे. नुकतीच न्यूयॉर्कच्या गव्हर्नरने त्या राज्यात मानवी मृतदेहापासून कंपोस्ट खत करण्यास मान्यता दिली आहे. अशी मान्यता देणारे न्यूयॉर्क हे अमेरिकेतील सहावे राज्य आहे. 2019 मध्ये वॉशिग्टनमध्ये ह्युमन कंपोस्टींगला सर्वप्रथम मान्यता देण्यात आली.

रिकॉम्पोज या कंपनीकडे हे ह्युमन कंपोस्टींगचे काम सोपवण्यात आले आहे. या कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार एका मानवी मृतदेहापासून सुमारे 36 गोणी खताची निर्मिती करता येऊ शकते.  मृतव्यक्तीच्या नातेवाईकांकडे हे तयार झालेले ह्युमन कंपोस्ट सोपवण्यापूर्वी त्यात काही हानिकारक घटक शिल्लक नाहीत ना हे काटेकोरपणे तपासले जाते.

असे केले जाते मृतदेहाचे विघटन

  • ज्या व्यक्तीला मृत्यूपश्चात आपल्या देहाचे खत तयार व्हावे अशी इच्छा असते त्याने तसे इच्छापत्र करणे आवश्यक असते.
  • मृताच्या नातेवाईकांनी सर्व कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करून मृतदेह कंपनीकडे सोपवला ही त्याला एका स्टीलच्या सिलेंडरमध्ये काही रसायनांसह ठेवले जाते.
  • रासायनिक प्रक्रीयेमुळे महिन्याभरातच मृतदेहाचे मातीत रुपांतर होते. या मातीचा उपयोग झाडांसाठी खत म्हणून करता येऊ शकतो.
  • मृतदेह दहन किंवा दफन करण्याच्या प्रचलित पद्धतीसाठी जेवढा खर्च येतो त्यापेक्षा कमी खर्चात ही प्रक्रीया होत असल्याचा दावा रिकॉम्पोज  या कंपनीने केला आहे.

अमेरिकेमध्ये सर्वसाधारणपणे मृतदेह दफन करण्याचीच पद्धत असल्याने ह्युमन कंपोस्टींगमुळे दफनासाठी जागेची अडचण काही प्रमाणात दूर होऊ शकते.

थोडक्यात झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया  या कवी ग्रेस यांच्या कवितेतील शब्दपंक्तींचा शब्दश: प्रत्यय अमेरिकेत घेतला जात आहे, हे म्हणणे समर्पक ठरेल.

SL/KA/SL

3 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *