या वर्षीच्या वर्ल्ड कप हॉकी साठी भारतीय संघ जाहीर
बंगळुरु, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ओडिसामध्ये 13 जानेवारीपासून होणाऱ्या पुरूष हॉकी वर्ल्डकप स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली. यात 18 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ग्रुप D मध्ये भारताबरोबरच इंग्लंड, स्पेन आणि वेल्स या संघाचा देखील समावेश आहे.
भारतीय संघाचे नेतृत्व ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंह करणार आहे तर अमित रोहिदास हा संघाचा उपकर्णधार असेल. SAI सेंटर बंगळुरू येथील दोन दिवसीय निवड चाचणी शिबीरानंतर संघाची घोषणा करण्यात आली आहे. या चाचणीत 33 खेळाडूंना आजमावून पाहण्यात आले. यानंतर अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला समतोल साधत 18 जणांचा अंतिम संघ निवडण्यात आला.
भारत 13 जानेवारीला राऊरकेलामध्ये स्पेनविरूद्ध खेळत आपली मोहीम सुरू करणार आहे. त्यानंतर भारतीय संघ आपला दुसरा सामना इंग्लंडविरूद्ध खेळेल. त्यानंतर भारतीय संघ वेल्सविरूद्धचा सामना खेळण्यासाठी भुवनेश्वरमध्ये पोहचेल. स्पर्धेची बाद फेरी 22 जानेवारी, क्रोसओव्हर सामने 23 जानेवारी, तर 25 जानेवारीला क्वार्टर फायनल सामने होतील. 27 जानेवारीला सेमी फायनल आणि 29 जानेवारीला फायनल होणार आहे.