डॉ. मीनाक्षी पाटील यांना रूपाली दुधगांवकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
मुंबई दि.2 (एम एमसी न्यूज नेटवर्क) : शिवार चैरिटेबल ट्रस्ट, माथला ता. जिंतूर जि. परभणी यांच्यावतीने देण्यात येणारा ‘रूपाली दुधगांवकर राष्ट्रीय पुरस्कार- 2022 – हा, सुप्रसिद्ध कवयित्री, चित्रकार, ललित लेखिका आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील (मुंबई) यांना आज एका पत्रकार परिषदेत घोषित करण्यात आला.
डॉ. मीनाक्षी पाटील यांचे, पोएट्रीवाला पेपरवॉल मीडिया अँड पब्लिशिंग, अंधेरी (पूर्व) मुंबई तर्फे ‘इज इट इन युवर ‘डीएनए'(2009) आणि ‘ललद्यदस् ललबाय’ (2022) हे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. यातून त्यांची कविता प्रदीर्घ, दीर्घ आणि मालिका कवितेच्या रूपात भेटते. खाजगी-उदारी- जागतिकीकरणाच्या सांप्रतकाळी मानवी मन सत्व-अस्तित्वाची होणारी तडफड आणि होरपळ, हा त्यांच्या कवितेचा आशय आहे.
ही कविता संवादी, प्रश्नात्मक, आध्यात्मिक आणि प्रायोगिक रूप घेताना दिसून येते, कवयित्रीने ‘1980 नंतरच्या निवडक कवींच्या कवितांचा उत्तर-आधुनिकतावादाच्या दृष्टिकोनातून चिकित्सक अभ्यास ‘ या विषयावर डॉक्टरेट केली आहे. तसेच पाटील यांचे ललित, चित्रकला, चित्रपट लेखन-दिग्दर्शन व कलाक्षेत्रातील एकूण कार्य लक्षात घेऊन, त्यांना रूपाली गणेशराव दुधगांवकर स्मृती- प्रीत्यर्थ मागील 21 वर्षापासून दिला जाणारा वरील पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र-चित्र आणि 21 हजार रुपये रोख असे आहे. एका मान्यवर तीन सदस्यीय निवड समितीच्या वतीने वरील नावाची एकमताने शिफारस करण्यात आली होती.
या पुरस्काराचे वितरण 12 जानेवारीला (गुरुवार) 5 वाजता, मिनी थिएटर, तिसरा मजला, पु.ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे कवी, कादंबरी-टीकाकार आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित लेखक, डॉ भालचंद्र नेमाडे ( जळगाव) यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मा. मंत्री खासदार अॅड. गणेशरावजी दुधगांवकर, डॉ. सौ. संध्याताई दुधगांवकर आणि इंजि. समीर दुधगांवकर आणि संदीप काळे ( संपादक, लेखक, साहित्यिक मुंबई) यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मापूर्वक देण्यात येणार आहे. अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. श्रीधर भोंबे यांनी यावेळी दिली. या पत्रकार परिषदेला अध्यक्ष डॉ. श्रीधर भोंबे, सदस्य डॉ. विलास पाटील, येशू पाटील, हेमंत दिवटे, डॉ. मंगेश बनसोड, डॉ. शत्रुघ्न फड, सुभाष जोशी, विजय चोरडिया आणि नामदेव कोळी यांची उपस्थिती होते.
SW/KA/SL
2 Jan. 2023