मंत्रालयीन राबवलेल्या बोगस भरतीची चौकशी करुन कारवाई करा
नागपूर, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंत्रालयात ‘क’ संवर्गातील लिपिकवर्गीय पदांची भरती सुरु असल्याचे खोटे सांगून मंत्रालयातील शिपाई पदावरील काही कर्मचाऱ्यांनी बोगस भरतीप्रक्रिया राबवली यातून झालेल्या फसवणुकीची चौकशी जाहीर झाली आहे.
या कर्मचाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवांच्या दालनात उमेदवारांच्या बोगस मुलाखतींचं नाटक घडवून आणलं. यातून अनेक युवकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. मंत्रालयात उपसचिवांच्या दालनातंच झालेल्या या बनवेगिरीची सखोल चौकशी करावी. दोषींना शिक्षा करावी आणि फसलेल्या तरुणांना न्याय द्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत माहितीचा मुद्दा उपस्थित करुन केली होती.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेला मुद्दा गंभीर असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असल्याचे सांगितले. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भूमिका तपासण्यात येईल, असे त्यांनी उत्तरादाखल सांगितले.
ML/KA/SL
30 Dec. 2022