टी-२० संघातून विराट-रोहितला विश्रांती की हकालपट्टी?

 टी-२० संघातून विराट-रोहितला विश्रांती की हकालपट्टी?

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीलंका संघाविरुद्ध आगामी जानेवारी महिन्यात होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड काल जाहीर करण्यात आली. १६ सदस्यांच्या या संघाचे कर्णधारपद अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडे देण्यात आले आहे. तर गेल्या वर्षभरात केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ मिळत सूर्यकुमार यादवची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या संघातून अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी वगळण्यात आले आहे. यांमुळे आता रोहित आणि कोहली यांना निवड समितीने विश्रांती दिली की त्यांची टी-२० संघातून हकालपट्टी केली, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे.

या वर्षी ऑस्ट्रेलियात टी-२० क्रिकेट विश्वचषक पार पडला होता. त्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र उपांत्य सामन्यात इंग्लंड संघाकडून त्यांना एकतर्फी पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघात बदलाची चर्चा सुरू झाली. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे वय लक्षात घेता त्यांनी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी, असा एक मतप्रवाह पुढे आला. तसेच नेतृत्त्व बदलाची मागणीही केली जाऊ लागली. या पार्श्वभूमीवर काल श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली.

या संघातून रोहित आणि विराट यांना वगळण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे. विश्वचषकातील अपयशानंतर तरुण खेळाडूंच्या हाती संघाची कमान देण्यासाठी हे बदल करण्यात आल्याचे म्हंटले जात आहे. तर दुसरीकडे २०२३ मध्ये भारतात एकदिवसीय विश्वचषक देखील रंगणार आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामनाही याच वर्षी खेळवला जाईल. या दोन फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी रोहित व कोहलीला टी-२० संघातून विश्रांती दिल्या गेल्याचे काहींचे म्हणणे आहे. आता यापैकी काय खरे आहे, हे निवड समितीच्या स्पष्टीकरणानंतरच समजू शकेल.

टी-20 संघ :

हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टिरक्षक), ॠतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हूडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

एकदिवसीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

TM/AK/SL

28 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *