गडकिल्ले आणि ऐतिहासिक वारसा स्थळांसाठी एक हजार कोटींचा निधी
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील गडकिल्ले , ऐतिहासिक वारसा स्थळे आदींच्या जीर्णोध्दारसाठी येत्या तीन वर्षात एक हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली.
यासंदर्भातील लक्षवेधी सूचना रत्नाकर गुट्टे यांनी उपस्थित केली होती, त्याला मेघना साकोरे , डॉ देवराव होळी यांनी उपप्रश्र्न विचारले , देग्लुर येथील श्री गुप्तेश्वर मंदिर , मराठवाड्यातील इतर मंदिरे , गडचिरोली येथील श्री मारकांडेश्वर मंदिर यांचा उल्लेख यात झाला.
जालना जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ खतगावकर यांना आर्थिक अपहार, बेकायदा औषध खरेदी , महिलांशी गैरवर्तन या गंभीर आरोप प्रकरणी निलंबित करण्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सभागृहात केली, नारायण कुचे यांनी ही लक्षवेधी उपस्थित केली होती. याशिवाय सचिव स्तरावर समिती नेमून त्यांची चौकशी ही केली जाईल असं सावंत यांनी जाहीर केलं. डॉ सतीश पवार आणि डॉ अर्चना पाटील यांची कंत्राटी नियुक्ती रद्द करण्याची घोषणा ही आरोग्य मंत्र्यांनी यावेळी केली.
शेतकऱ्यांचे विविध प्रकारचे होणारे नुकसान मोजण्यासाठी एक ॲप विकसित करून ई पंचनामे करण्याची प्रणाली विकसित केली जाते आहे अशी माहिती या खात्याचे प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली, यासंदर्भातील लक्षवेधी सूचना दीपक चव्हाण यांनी उपस्थित केली होती, नाना पटोले, बळवंत वानखेडे यांनी यावर उपप्रश्न विचारले होते.
ML/KA/SL
27 Dec. 2022