जाणून घ्या साहित्य अकादमी पुरस्कार २०२२ चे मराठी मानकरी
नवी दिल्ली, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साहित्य अकादमीच्या २०२२ साठीच्या वार्षिक साहित्य पुरस्कारासाठी मराठी व कोकणी या दोन्ही भाषांतील कादंबऱ्यांची निवड करण्यात आली आहे. मराठीसाठी प्रवीण दशरथ बांदेकर यांच्या `उजव्या सोंडेच्या बाहुल्या` या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. कोकणीसाठी माया अनिल खर्नांगटे यांच्या अमृतवेल या कादंबरीची निवड करण्यात आली आहे.
तर ‘इन गुड फेथ’ या सबा नकवी लिखित इंग्रजी पुस्तकाच्या ‘सलोख्याचे प्रदेश : शोध सहिष्णू भारताचा‘ या मराठी अनुवादासाठी प्रमोद मुजुमदार यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रत्येकी १ लाख रूपये रोख, सन्मानचिन्ह व शाल असे पुरस्काराचे स्वरूप असून अकादमीच्या साहित्य अक्षरोत्सवात पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ संपादक व खासदार कुमार केतकर आणि प्रा. नितीन रिंढे यांच्या निवड समितीने यंदाच्या मराठी साहित्यकृतीची निवड या पुरस्कारसाठी केली.
यंदा इंग्रजीसाठी अनुराधा रॉय यांच्या – ऑल द लाईव्हज व्हेनेव्हर लिव्हड या पुस्तकाची, तर हिंदीसाठी थुमाडी के शब्द या बद्रीनारायण यांच्या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. अन्य प्रादेशिक भाषांतील पुरस्कार लवकरच जाहीर केले जाणार आहेत.
22 Dec. 2022