अवघ्या चार महिन्यात ५२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

 अवघ्या चार महिन्यात ५२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ऑगस्ट महिन्यातील पावसाळी अधिवेशन संपून जेमतेम चार महिने झाले असतानाच आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल ५२ हजार कोटींच्या नव्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी घसघशीत साडेपाच हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निधीतील ४ हजार ५०० कोटी रुपये हे महापालिका आणि नगरपालिकेला वैशिष्ट्यपूर्ण विकास  कामासाठी दिले जातील. तर ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा तसेच विविध विकास  कामासाठी अतिरिक्त १ हजार  कोटी रुपये मिळणार आहेत.

दोन्ही सभागृहात आज ५२ हजार ३२७ कोटी ८३ लाख  रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या याआधी पावसाळी अधिवेशनात २८,८२६ कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या होत्या. आज सादर करण्यात आलेल्या मागण्या या महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात इतक्या मोठ्या रक्कमेच्या पुरवणी मागण्या सादर होण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पुरवणी मागण्या मांडल्या.

विधानसभेत या मागण्यांवर  येत्या  २१ आणि २२ डिसेंबर रोजी चर्चा तसेच मतदान होऊन त्या मंजूर करण्यात येतील.

राज्यातील कृषी पंपधारक शेतकरी आणि इतरांना विद्युत प्रशुल्कात देण्यात येणाऱ्या सवलतींवरचा खर्च भागवण्यासाठी ४ हजार  ९९७  कोटी रुपये  इतकी तरतूद  पुरवणी मागणीत करण्यात आली आहे.  अतिवृष्टीग्रस्त तसेच नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या  शेतकऱ्यांना मदतीसाठी ३ हजार २००  कोटी रुपये या मागण्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

ML/KA/PGB
19 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *