आगामी महासंग्रामासाठी लक्ष्य ५१ टक्के मते ठेवा…
नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): लोकसभेच्या २०२४ साली होणाऱ्या निवडणुकीत होणाऱ्या महासंग्रामासाठी ‘अभी नही तो कभी नही’ या जिद्दीने कामाला लागावे. सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवावीत आणि निवडणुकीत ५१ टक्के मते मिळविण्यासाठी संघटना बळकट करावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा प्रदेश प्रभारी सी. टी. रवी तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केले.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व जिल्हा संघटन सरचिटणीसांची एक दिवसीय बैठक नागपूर येथे सोमवारी झाली. या बैठकीच्या उद्घाटनसत्रात हे नेते बोलत होते. यावेळी भाजपा राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाशजी, प्रदेश सहप्रभारी जयभानसिंह पवैय्या आणि ओमप्रकाश धुर्वे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, संजय केणेकर, रणधीर सावरकर आणि विजय चौधरी उपस्थित होते.Aim for 51 percent votes for the upcoming election
सी. टी. रवी म्हणाले की, महाविकास आघाडीला लोक महावसुली आघाडी म्हणत असत. पण आता राज्यात विकासाचे डबल इंजिन असलेले सरकार आले आहे. विकासाचे राजकारण सुरू झाले आहे. पण भाजपाने आत्मसंतुष्ट होण्याचे कारण नाही. आपला संघर्ष अजूनही चालू आहे.
सरकारच्या योजना समाजातील शेवटच्या माणसापर्यंत कशा पोहोचतील यासाठी कार्यकर्त्यांनी काम करायचे आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेला वारंवार सांगत राहिले पाहिजे. यासाठी संघटनात्मक जाळे बळकट करायचे आहे.
ते म्हणाले की, आगामी २०२४ च्या निवडणुकीत महासंग्राम आहे. त्यासाठी पक्षाने संघटना सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात योजना निश्चित करून काम करण्याची गरज आहे.
भाजपाचे हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि विकास हे धोरण आहे. हिंदुत्व हा केवळ भाजपाचा नाही तर देशाचा आत्मा आहे. देशावर जेव्हा जेव्हा संकट आले त्यावेळी महाराष्ट्राने योगदान दिले आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यातील विविध जिल्ह्यांचा प्रवास करताना आपल्याला आढळले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर जनतेमध्ये पक्षासाठीचा पाठिंबा वाढला असून कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. पण आगामी निवडणुकीत आपली ५१ टक्क्यांची लढाई आहे. आपल्याला पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळवायची आहेत व त्यासाठी भाजपाची संघटना मजबूत करायची आहे.
आगामी निवडणुकीत जेथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उमेदवार असतील तेथेही भाजपाच्या संघटनेचा पाठिंबा त्यांना उपयोगी पडेल. त्यामुळे पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आक्रमक रितीने कृतीशील भूमिकेत जावे लागेल. अभी नही तो कभी नही या जिद्दीने काम करावे लागेल.
ML/KA/PGB
19 Dec .2022