राज्यातील सत्ता संघर्ष प्रकरणी सुनावणी दहा जानेवारीला
नवी दिल्ली,दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर आज शिंदे- ठाकरे गटामध्ये सुरु असलेल्या सत्तासंघर्षाची सुनावणी झाली. घटनापीठासमोर झालेल्या काही मिनिटांच्या युक्तिवादात ठाकरे गटाच्या वकिलांनी सदर खटला सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर चालवावा, अशी मागणी केली. मात्र कोर्टाने ती फेटाळून लावली आहे.
शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईसंदर्भातील, यासोबतच राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांच्या अधिकार कक्षा स्पष्ट करणाऱ्या या महत्त्वाच्या खटल्याची पुढील सुनावणी येत्या 10 जानेवारी रोजी होईल, असे आदेश कोर्टाने दिले.
शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सदर खटला सात न्यायाधीशांसमोर चालवण्याची मागणी केली. मात्र कोर्टाने ही मागणी आज फेटाळली. यासंदर्भात सविस्तर आणि रितसर मागणी करण्याच्या सूचना कोर्टाने दिल्या. कपिल सिब्बल आता लेखी स्वरुपात ही मागणी सादर करतील.
13 Dec. 2022