आफताबला फाशी द्या; श्रद्धाचे वडील विकास वालकरांची मागणी
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): माझी मुलगी श्रद्धा हिची अत्यंत क्रूरपणे हत्या करणारा आफताब पुनावाला याला फाशीची शिक्षा देण्यात यावी,त्याच्या कुटूंबियांची चौकशी व्हावी,तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग असल्यास त्यांनाही शिक्षा व्हावी अशी मागणी श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेला भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमय्या उपस्थित होते.Hang Aftab; Shraddha’s father Vikas Walker’s demand
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर विकास वालकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली.
दिल्ली पोलीस आणि वसई पोलीस संयुक्तपणे गुन्ह्याचा तपास करत आहेत.
दिल्ली पोलिसांचा तपास व्यवस्थित सुरू आहे. त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. मात्र या प्रकरणात सुरुवातील स्थानिक पोलिसांनी असहकाराची भूमिका घेतली. त्यामुळे मला त्रास झाला. तुळींज आणि माणिकपूर पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेची चौकशी व्हायला हवी. त्यांनी असहकार्याची भूमिका घेतली नसती तर माझी मुलगी जिवंत असती किंवा काही पुरावे मिळण्यात मदत झाली असती, अशा शब्दांत वालकर यांनी स्थानिक पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
श्रद्धाच्या मृत्यूचं आम्हाला दु:ख आहे. आम्ही आमचं दु:ख कधीच विसरू शकणार नाही. आम्हाला न्याय मिळेल असा शब्द दिल्ली पोलिसांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
न्यायालयावर, न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास असल्याचं वालकर म्हणाले. श्रद्धाला अतिशय क्रूरपणे संपवणाऱ्या आफताब पुनावाला याला फाशीची शिक्षा व्हावी. त्याच्या कुटुंबियांची चौकशी व्हावी. ते दोषी आढळल्यास त्यांनाही शासन व्हावं असे वालकर म्हणाले.खून प्रकरण उघडकीस आल्यानंतर किरीट सोमय्या आणि नीलम गोऱ्हेंनी माझी आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्याबद्दल वालकर यांनी त्यांचे आभार मानले.
ML/KA/PGB
9 Dec .2022