त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीला संरक्षण कवच

 त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीला संरक्षण कवच

नाशिक,दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यशासनाने  पर्यावरण प्रेंमींसाठी अतिशय दिलासादायक असा निर्णय घेतला आहे. शहरीकरणाच्या रेट्यातही आपले निसर्ग सौदर्य जपणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रह्मगिरी पर्वताशी संलग्न 97 किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या जैवविविधतापूर्ण परिसराला  सुरक्षा कवच मिळाले असून त्र्यंबकेश्वरसह इगतपुरी आणि कळवणचा काही भाग संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र सरकारने  वनक्षेत्रांना नुकताच संवर्धन राखीव हा दर्जा बहाल केला. यामध्ये वाघेरा, वरसविहीर, गोरठाण, आंबोली, वेळुंजे, अंबई, काचूर्ली, कळमुस्ते, उभाडे, आळवंड, मेटघर किल्ला, चंद्रयाची मेट, अस्वली हर्ष, हर्षवाडी, आव्हाटे, वाढोली, कोजुली, पाहीन, भिलमाळ, त्र्यंबकेश्वर आदी परिसर संवर्धन राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

दरम्यान गेल्या काही महिन्यात त्र्यंबकच्या मागील बाजूस ब्रम्हगिरीला सुरुंग फोडण्याचे काम सुरु होते. यास आता आळा बसणार आहे. या निमित्ताने ब्रम्हगिरीला एकप्रकारे कवच मिळाले असून भूमाफियांच्या चोरीला चाप बसणार आहे.

त्र्यंबकेश्वर हे देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक तीर्थस्थळ आहे. वर्षभर या ठिकाणी भाविकांची वर्दळ असते. तर येथील ब्रह्मगिरी पर्वताला श्रावण महिन्यात लाखो भाविक प्रदक्षिणा घालतात.  या पूर्ण परिसरात अनेक गड-किल्ले असून ट्रेकर्सना हा परिसर अतिशय प्रिय आहे.

अशा या पर्यारणीय, ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परिसराच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी सरकारने लक्ष द्यावे आणि भूमाफीयांपासून याचा बचाव व्हावा यासाठी पर्यावरण प्रेमी सातत्याने पाठपुरावा करत होते. अखेर त्यांचा या प्रयत्नास यश मिळून त्र्यंबक-ब्रह्मगिरी परिसराला कायदेशीर सुरक्षा कवच मिळाले आहे.

SL/KA/SL

8 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *