गुजरात निवडणूकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या

 गुजरात निवडणूकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या

गांधीनगर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधानांचे राज्य असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणूकीमधील पहिल्या टप्प्यातील प्रचाराचे पडघम आज शांत झाले. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान आणि देशातील महत्त्वाच्या भाजप नेत्यांच्या सभा आणि रॅलीज यांनी गुजरात दणाणून गेला होता. आता उद्या (दि.1) 89 जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.

सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरातमधल्या 89 जागांसाठी उद्या 2 कोटी 39 लाख मतदार मतदान करतील. 778 उमेदवार या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. मतदानासाठीची पूर्वतयारी आता पूर्ण झाली असून  यासाठी 19 जिल्ह्यांमध्ये एकंदर 25430 मतदान केंद्रं तयार करण्यात आली आहेत. मतदार माहितीपत्रांचं वाटप देखील पूर्ण झाले आहे.

प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकी एक मतदान केंद्र पर्यावरणपूरक मतदान केंद्र, एक नमुना मतदान केंद्र असेल तर प्रत्येकी एका मतदान केंद्रात दिव्यांग नागरिक पूर्ण काम पाहतील. याशिवाय 11 सखी मतदान केद्रांमध्ये सगळं कामकाज महिला निवडणूक अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचारी पाहतील. तर 18 युवा मतदान केंद्रांचं नियंत्रण तरुण कर्मचारी वर्गाकडे राहणार आहे.

आशियायी सिंहांसाठी प्रसिद्ध असलेल्या गीरच्या जंगलात फक्त एकाच मतदारासाठी मतदान केंद्र उभारण्यात आलं आहे,एक मतदान केंद्र मालवाहतुकीच्या वाहनावर तर एक अरबी समुद्रातल्या एका बेटावरही कार्यरत असणार आहे.
एकंदरीतच पंतप्रधानांचे होमस्टेट आणि भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या या निवडणूकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहीलेले असल्यामुळे निवडणूक व्यवस्थापनामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही याची काळजी घेण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे.
SL/KA/SL

30 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *