IFFI मध्ये काश्मीर फाईल्सवर ज्युरींचा निशाणा, विवेक अग्निहोत्रींकडून खुलं आव्हान

 IFFI मध्ये काश्मीर फाईल्सवर ज्युरींचा निशाणा, विवेक अग्निहोत्रींकडून खुलं आव्हान

पणजी,दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘द काश्मीर फाइल्स’ या विवेक अग्निहोत्री दिग्दर्शीत चित्रपटाबाबत ज्युरींनी केलेल्या विधानामुळे चांगलाच वादंग निर्माण झाला आहे.

या महोत्सवाच्या समारोपाच्या कार्यक्रमात  मुख्य ज्यूरी नादव लॅपिड यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ ला IFFI सारख्या प्रतिष्ठित महोत्सवातील स्पर्धा विभागात परवानगी दिल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली.

नादव लॅपिड म्हणाले, “या महोत्सवतील 15वा चित्रपट ‘द काश्मिर फाईल्स’ पाहून आम्हा सगळ्यांनाच धक्का बसला. आम्ही खूपच अस्वस्थ झालो. आमच्यामते हा चित्रपट एका विशिष्ट विचारधारेचा प्रचार करणारा (प्रोपगंडा) आणि असभ्य(वल्गर) चित्रपट आहे. एवढ्या प्रतिष्ठित सोहळ्यात या चित्रपटाला स्थान मिळणं हे अयोग्य आहे.”

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत नादव लॅपिड यांनी ही टिप्पणी केली. दरम्यान लॅपीड यांच्या या विधानाचा इस्राएली दुतावासाने निषेध केला आहे. दुसरीकडे, इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन यांनी तुमच्या वक्तव्याची मला लाज वाटते, असे लॅपीड यांना सुनावले आहे.

या साऱ्या घटनाक्रमावर सोशल मिडीयावर मतमतांतरे उमटली आहेत. अनेकांनी दिग्दर्शक अग्निहोत्री यांनी या बाबत भूमिका मांडावी अशी मागणी लावून धरली. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी  एका व्हिडिओच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे, ते म्हणतात

“या चित्रपटाला नावं ठेवणं ही माझ्यासाठी काही नवी गोष्ट नाही. आतंकवादी संघटना, अर्बन नॅक्सल्स आणि भारताचे तुकडे करू पाहणाऱ्या लोकांचं हे नेहमीचं काम आहे. मला वाईट या गोष्टीचं वाटतं की भारत सरकारच्या कार्यक्रमात भारत सरकारच्या मंचावर काश्मीरला भारतापासून वेगळं करण्याच्या विचारधारेला पाठिंबा दिला गेला. मी ४ वर्षांपासून या चित्रपटावर काम करत आहे, तेव्हापासून ही लोक या चित्रपटाला प्रोपगंडा म्हणत आहे. ७०० पीडित लोकांच्या मुलाखती घेऊन आम्ही हा चित्रपट सादर केला आहे, ती ७०० माणसं काय प्रोपगंडा आणि अश्लील गोष्टी सांगत होती का? आजही काश्मीरमध्ये हिंदू लोकांना मारलं जातं, हा प्रोपगंडा आहे का? आज मी या महान बुद्धिजीवी लोकांना या महान इस्रायलच्या चित्रपटनिर्मात्यांना आव्हान देतो, की या चित्रपटातील एक जरी दृश्यं, डायलॉग, घटना सत्य नसल्याचं सिद्ध केलंत तर मी चित्रपट बनवणं सोडून देईन. भारताविरोधात उभी राहणारी ही मंडळी आहेत तरी कोण? मी घाबरणारा माणूस नाही, मी शेवटपर्यंत लढत राहीन.”

SL/KA/SL

29 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *