वर्षभरात धावणार आरे ते बीकेसी मेट्रो रेल्वे..
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतातल्या सर्वात कठीण गणल्या जाणाऱ्या मेट्रो ३ या भूमिगत रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजेच आरे ते बीकेसी दरम्यान डिसेंबर २०२३ मध्ये म्हणजे अवघ्या वर्षभरात कार्यान्वित होणार असून त्यानंतर अवघ्या ६ महिन्यातच दुसरा टप्पा पूर्ण होणार आहे. बीकेसी ते कुलाबा या मार्गावर मेट्रो सेवा सुरू होणार असल्याची माहिती मेट्रो ३ चे प्रकल्प संचालक सुबोध कुमार गुप्ता यांनी एमआयडीसी येथे दिली.Aarey to BKC metro rail will run within a year..
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे या पाहणी दौऱ्याची आखणी नुकतीच करण्यात आली होती.एमआयडीसी मेट्रो स्थानक व जमिनी अंतर्गत बांधलेल्या भुयारी मार्गाची संपूर्ण पाहणी या वेळेस उपस्थित पत्रकारांनी केली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत सुबोध कुमार गुप्ता यांनी मेट्रो रेल्वेच्या २०१६ पासून सुरू झालेल्या कामाची व आतापर्यंत पार पडलेल्या कामाची विस्तृत माहिती दिली.
भारतातल्या इतर मेट्रो रेल्वे प्रकल्पा पेक्षा हा मार्ग सर्वात कठीण होता. मुंबई सारख्या अत्यंत दाटीवाटीने वसलेल्या शहरात जमिनीखालून भुयारे खणून सुमारे ३३.५ किमी लांबीचा मार्ग तयार करणे, १५० वर्षाहून अधिक जुन्या इमारती तसेच उत्तुंग टॉवर्सना जराही धक्का लागू न देता काम करणे हे प्रचंड जिकिरीचे आणि कौशल्याचे काम होते .आमच्या टीमने ते यशस्वीपणे पार पाडले याचा आम्हाला अभिमान असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
मेट्रो ३ या लाईन वर एकूण २७ स्थानके असून यातील जवळपास सर्वच म्हणजे २६ स्थानके भूमिगत असून केवळ आरे हे एकच स्थानक जमिनीच्यावर आहे.मुंबईकरांना सिप्झ ते कुलाबा या मार्गाचा प्रवास करण्यासाठी केवळ एक तासाचा कालावधी लागणार असून यामुळे प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे . ही रेल्वे सेवा दिवसभरात एकूण १७ लाख प्रवाशांची ने- आण करणार असून एका वेळी सुमारे २५०० प्रवासी प्रवास करू शकतील .
मेट्रो ३ मार्गाचे सुमारे ७६ .६ % काम पूर्ण झालेले आहे . मेट्रो मार्गावरील सर्व स्थानके जमिनीच्या पातळीपासून सुमारे २१५ मीटर खाली आहेत . जमिनीच्यावर देखील सुमारे ६ फूट वर धरून स्थानकां ची बांधणी झाल्याने मुंबईत २६ जुलै २००५ एवढा जरी पाउस झाला तरी स्थानकात व मार्गात कुठेही पाणी तुंबण्याची जरा देखील शक्यता नाही .
भारताच्या इतिहासात प्रथमच एकच वेळी १७ टिबीएम (टनेल बोअरिंग मशिन्स) ने जमिनीखालून बोगदे खणण्यास सुरुवात केल्याचे हे एकमेव उदाहरण असल्याचे गुप्ता यांनी सांगीतले .
या मार्गावरील सर्वात कठीण काम कुठले? असा प्रश्न विचारला असता बीकेसी ते धारावी दरम्यान चा ३ किमी लांबीचा मार्ग जो मिठी नदी खालून काढला आहे तो असल्याचे गुप्ता यांनी सांगितले व नदी च्या खालून भुयारी मार्ग काढण्याचा भारतातील हा केवळ दुसराच मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाहणी करीता निवडलेले एमआयडीसी मेट्रो स्थानक हे मेट्रो ३ मधील कुलाब्यापासूनचे उत्तरेकडील २५ वे भूमिगत स्थानक असून हे पॅकेज ७ च्या अंतर्गत येते. मरोळ औद्योगिक वसाहत, चकाला औद्योगिक वसाहत, कोंडीविटा इत्यादी व त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील भागांना हे स्थानक उपयुक्त ठरणार आहे. तसेच येथील बीएमसी, एमसीजीएम मार्केट, इएसआयसी उप-प्रादेशिक कार्यालय, पासपोर्ट सेवा केंद्र अंधेरी, सेव्हन हिल्स रुग्णालय, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड कार्यालय, आकृती व्यापार केंद्र यासारख्या महत्त्वाच्या संस्थांना ही सेवा उपलब्ध होईल. Aarey to BKC metro rail will run within a year..
मेट्रो-३ मार्गिकेतील एमआयडीसी स्थानकाच्या छताचे काम, पायलिंग प्रक्रिया, कॉन्कोर्स स्लॅब आणि बेस स्लॅबचे काम पूर्ण करणारे पहिले स्थानक ठरले आहे. या स्थानकाला ४ प्रवेशद्वार व निकास मार्ग असून ९ सरकते जिने (Escalator) आणि ५ उदवाहक (lifts) आहेत. अंधेरीतील व्यावसायिक केंद्रे, कार्यालयांच्या उंच इमारतींना MIDC मेट्रो स्थानकाद्वारे सहज प्रवेश मिळणार आहे.
या मेट्रो स्थानकाची एकूण लांबी साधारण २४० मीटर असून त्याची खोली २१.५ मीटर, रुंदी २४. ५ मीटर आहे.
पॅकेज ७ मधील इतर स्थानकांमध्ये सिप्झ आणि मरोळ नाका यांचाही समावेश आहे. आतापर्यंत या पॅकेजमध्ये बोगद्याचे व ट्रॅकचे प्रत्येकी १००% काम पूर्ण झाले आहे.
तसेच आतापर्यंत एकूण ९४.७% बांधकाम आणि ७६.८% प्रणालीचे काम पूर्ण झाले आहे.
मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन ने या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या सुमारे 2856 कुटुंबाचे पुनर्वसन केले आहे. एकूण 38 हजार कोटी खर्चून सुरू होणाऱ्या मेट्रो 3या रेल्वे प्रकल्पामुळे रस्त्यावरील ट्रॅफिक ची समस्या तसेच पेट्रोल- डिझेल मुळे होणारे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर कमी होणार असून मुंबईकरांना माफक दरात थंडगार एसी चा प्रवास करायला मिळणार आहे.
ML/KA/PGB
27 Nov .2022