आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय मक्याला मोठी मागणी
मुंबई,दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतात आत्तापर्यंत फक्त कापूस या पिकामध्येच जीएम (Genetically Modified) वाणाच्या वापरास परवानगी आहे. अन्य पिकांना तशी परवानगी नसल्याने अधिक शेतकऱ्यांचे नुकसान होते अशा चर्चा अनेकदा घडून येतात मात्र पिकांचे जीएम वाण न वापरण्याचे फायदेही समोर येतात. भारतीय मक्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलेल्या मागणी वरून हे स्पष्ट झाले आहे.
युरोपियन युनियन ला खाद्यान्न म्हणून भारतीय मका हवा आहे. सध्या भारतीय मक्याची (Indian Maize) मागणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढली आहे. युरोपियन युनियनला (EU) भारताकडून मक्याचा अधिकाधिक पुरवठा व्हावा, अशी अपेक्षा आहे. कारण भारतीय मका हा नॉन जीएम (GM) म्हणजे जनुकीय बदल न केलेला असतो. There is a huge demand for Indian maize in the international market
व्हिएतनाम, मलेशिया आणि श्रीलंका इ. देशातूनही भारतीय मक्याला मागणी वाढण्याची शक्यता आहे, शेतमाल अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार यंदा (२०२२-२३) मक्याचे विक्रमी २३.१० दशलक्ष टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी २२.६३ दशलक्ष टन उत्पादन झाले होते.
खरीप मक्याची आवक सुरू झाली असून ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात मक्याचे भाव जवळपास २२०० रूपये प्रति क्विंटलवर पोहोचले होते. गेल्या वर्षी याच कालावधीत दर १६५० रूपयाच्या आसपास होते.
एकूणच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मक्याची मागणी वाढल्याने यावर्षी खरीप हंगामात देशांतर्गंत बाजारपेठेत मक्याचे भाव तेजीत राहतील अशी चिन्हे दिसत आहेत.
मका पिकवणाऱ्या देशांमध्ये, भारत क्षेत्रफळात चौथ्या क्रमांकावर आणि उत्पादनात सातव्या क्रमांकावर आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश,महाराष्ट्र आणि बिहार ही प्रमुख मका उत्पादक राज्ये असून 2017 पासून आत्तापर्यंत मका लागवड क्षेत्रात सुमारे 50% वाढ झाली आहे.
2021 च्या अखेरीस भारताची मका निर्यात $1.03 अब्ज डॉलर्सच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली होती.
SL/KA/SL1
23 Nov. 2022