स्नातकांनी देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी योगदान द्यावे
औरंगाबाद, दि.19 :- आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक घटकाचा सहभाग महत्वाचा आहे. स्नातकांनी देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 62 व्या दीक्षांत समारंभाप्रसंगी राज्यपाल बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खा. शरद पवार, पद्मभुषण डॉ.विजय भटकर, कुलगुरू डॉ.प्रमोद येवले आदी उपस्थित होते.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती होत आहे. विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्तेसोबत विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा तसेच मुल्यांच्या विकासावरही भर देणे गरजेचे आहे. नव्या शैक्षणिक धोरणात सर्वच बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विज्ञानासोबतच संगीत शिकण्याची संधी देखील उपलब्ध झाली आहे. स्नातकांनी महापुरूषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे.
देश जागतिक पातळीवर प्रगतीकडे झेप घेत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीबाबत जाणून घेण्यासाठी राज्यातील अनेक कुलगुरू इतर देशात तसेच इतर देशातील कुलगुरू आपल्या राज्यात आले आहेत. या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील विचारांची देवाण घेवाण होण्यास मदत झाली आहे. स्नातकांनी आपले ध्येय सुनिश्चित करुन ध्येय पूर्ण करण्यासाठी सातत्याने काम करावे. राष्ट्रसेवेचा संकल्प करावा व समाज परिवर्तनासाठी पुढे यावे असे आवाहन राज्यपाल कोश्यारी यांनी केले.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले,
प्रगतीशिल, समृद्ध व संपन्न समाजाच्या निर्मितीसाठी विद्यापीठांची भूमिका महत्वाची आहे. शैक्षणिक क्षेत्रात गुणात्मक परिवर्तन व त्या भागातील सर्वांगिण विकासासाठी विद्यापीठाचे योगदान महत्वाचे आहे.
प्रगतीशिल मराठवाड्यासाठी विद्यापीठाची भूमिका महत्वाची ठरणार असून शैक्षणिक क्षेत्रासोबतच विकासाची दिशा भविष्यातील पिढीला देणारे केंद्र विद्यापीठ असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यापीठ हे एक ज्ञानशक्ती केंद्र आहे. विद्यापीठाने त्या भागातील विविध क्षेत्रातील संशोधनातही अग्रेसर असावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पद्मभूषण डॉ.विजय भटकर म्हणाले,
नविन शैक्षणिक धोरण अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. यामध्ये उच्च शिक्षण प्रादेशिक भाषेतून देण्याबाबत अंतर्भाव करण्यात आला आहे. विद्यापीठ, शाळा, शैक्षणिक पद्धती अत्यंत महत्वाची आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात केले आहे.
भारतातील अनेक विद्यार्थी जगभरात कार्यरत आहेत. देशाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून यामुळेच भारत जगातील आर्थिकदृष्ट्या सक्षम राष्ट्र म्हणून पुढे येईल.
खासदार शरद पवार म्हणाले,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातही औरंगाबाद पुढे येत आहे. नविन पिढीला आंतरराष्ट्रीय पातळीवर दालने खुले करुन देण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा. शैक्षणिक क्षेत्रासोबतच मराठवाड्यातील शेतीक्षेत्रही बदलू लागले आहे.
मराठवाड्यात वाढू लागलेल्या ऊस शेतीला चालना देण्याचा आपला प्रयत्न आहे. वसंतराव नाईक शुगर इन्स्टिट्युटच्या माध्यमातून जालना येथे शेती, उद्योग व तंत्रज्ञान क्षेत्रात संधी देणारी संस्था लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची वाटचाल, उपक्रम, नविन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी तसेच दीक्षांत समारंभाच्या आयोजनाबाबत कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी माहिती दिली.
यावेळी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व खासदार शरद पवार यांना डी.लिट प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.भगवान साखळे, परीक्षा मुल्यमापन मंडळाचे डॉ.गणेश मंझा तसेच विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता तसेच स्नातक उपस्थित होते.
ML/KA/SL
19 Nov. 2022