दिवसाच्या वीजवापरात ७० लाख ग्राहकांना २२३५ कोटी रुपयांचा लाभ

 दिवसाच्या वीजवापरात ७० लाख ग्राहकांना २२३५ कोटी रुपयांचा लाभ

मुंबई, दि. ०३ : राज्यातील वीज ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीजवापरासाठी टीओडी (टाइम ऑफ डे) सवलत जुलै २०२५ मध्ये लागू केल्यापासून आतापर्यंत ७० लाख ग्राहकांना एकूण २२३५ कोटी रुपयांचा लाभ झाला असून त्यामध्ये १५,९०७ उच्चदाब औद्योगिक ग्राहक एकूण १५३४ कोटी रुपयांच्या लाभासह प्रथम स्थानावर आहेत, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.

विजेचा वापर कोणत्या वेळेत झाला त्याच्या आधारे वीजदरात सवलत दिली जाते त्याला टीओडी सवलत म्हणतात. राज्यात जुलै २०२५ पासून १० किलोवॅटपेक्षा जास्त भार असलेल्या औद्योगिक व वाणिज्यिक वीज ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीज वापरासाठी सवलत देण्यात आली. या ग्राहकांना एप्रिल ते सप्टेंबर या महिन्यांसाठी १५ टक्के तर ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांसाठी २५ टक्के इतकी मोठी सवलत देण्यात येत आहे.

सर्व घरगुती ग्राहकांनाही प्रथमच टीओडी सवलतीचा लाभ देण्यास सुरुवात झाली असून चालू आर्थिक वर्षात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीज
वापरासाठी प्रती युनिट ८५ पैसे सवलत देण्यात येते. स्मार्ट मीटरमध्ये कोणत्या वेळी किती वीजवापर झाला हे मोजण्याची सुविधा असल्याने स्मार्ट मीटर बसविलेल्या घरगुती ग्राहकांना या सुविधेचा लाभ होत आहे.

औद्योगिक ग्राहकांमध्ये उच्च दाब औद्योगिक ग्राहक, उच्चदाब हंगामी औद्योगिक ग्राहक, लघुदाब औद्योगिक ग्राहक आणि यंत्रमाग असा एकत्रित विचार केला तर ४३,९११ औद्योगिक ग्राहकांना एकूण १,७७४ कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. राज्यातील उच्चदाब व लघुदाब अशा ११,०१७ वाणिज्यिक ग्राहकांना एकूण २३९ कोटी रुपयांचा लाभ झाला आहे.

घरगुती ग्राहकांना टीओडीचा लाभ मिळण्यास सुरुवात झाल्यापासून त्यांना १,०९६ दशलक्ष युनिट इतक्या विजेसाठी ८९ कोटी रुपयांचा लाभ झाला आहे. या कालावधीतील लाभधारक घरगुती ग्राहकांची संख्या ६९,३५,३८८ इतकी होती.

राज्यात घरोघरी स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेने वेग घेतला आहे. त्यासोबत टीओडी लाभ मिळणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांची संख्याही वाढत आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीजदरातील सवलतीचा लाभ सार्वजनिक पाणीपुरवठा आणि अन्य सार्वजनिक सेवांसाठीही झाला आहे. या घटकांसाठी संबंधित १२,९८९ ग्राहकांना २०२ कोटी रुपयांचा टीओडी लाभ झाला आहे.

राज्यातील सौरऊर्जेसारख्या नवीकरणीय उर्जेची उपलब्धता वाढली आहे. ही वीज स्वस्त मिळत असल्याने महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार दिवसाच्या वीजवापरासाठी सवलत लागू केली आहे. वीज ग्राहकांनी अधिक विजेची गरज असणारी उपकरणे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत प्राधान्याने वापरून टीओडी सवलतीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *