मोर्चावर संताप व्यक्त करणाऱ्या महिलेचे भाजपा आयटी सेल व समर्थकांकडून चारित्र्यहनन; हाच का भाजपाचा महिलांबद्दलचा दृष्टीकोन?
सुरेशचंद्र राजहंस यांचा सवाल
मुंबई, दि २४
भारतीय जनता पक्षाने महिला आरक्षणासाठी वरळी भागात एक मोर्चा काढला होता पण या मोर्चामुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. भाजपाच्या मोर्चावर सर्व माध्यमातून टिकेची झोड उठल्यानंतर मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फक्त आयोजकांवर गुन्हा दाखल करून चालणार नाही तर या मोर्चात सहभागी भाजपाचे नेते व मंत्री यांच्यावरही गुन्हे दाखल करा, अशी मागणी मुंबई काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सुरेशचंद्र राजहंस म्हणाले की, मोर्चा काढायचा असेल वा आंदोलन करायचे असेल तर पोलीसांची परवानगी घ्यावी लागते, आठ आठ दिवस आधी पत्र पाठवूनही पोलीस विरोधी पक्षांच्या आंदोलनाला लवकर परवानगी देत नाहीत. परवानगी दिली तर अनेक अटी व शर्थी घातल्या जातात पण भाजपाच्या या मोर्चाला दोन दिवसातच परवानगी दिल्याची माहिती मिळत आहे. सत्ताधारी पक्षांना नियम वेगळे व विरोधी पक्षांना वेगळे अशी पद्धत पोलीस प्रशासनात रुढ होत चालली आहे, हे अत्यंत घातक आहे. काँग्रेस पक्षाने याआधी जेव्हा आंदोलने केली, त्यावेळी आयोजक व सहभागी नेत्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, मग वरळीच्या मोर्चाप्रकरणी फक्त आयोजकावरच गुन्हे का? सहभागी मंत्र्यांवर, आमदारांवर गुन्हे का दाखल करत नाही? पोलिसांनी कायद्याने काम करावे, राजकारण करू नये, असेही सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे.
भाजपच्या वरळीतील मोर्चामुळे दोन तासापेक्षा जास्तवेळ वाहतूक कोंडी झाली होती, पोलिसांचा फौजफाटा वाहतूक सुरुळीत करण्यापेक्षा मंत्र्यांच्या भोवतीच फिरत होता. एका महिलेने मोर्चात सहभागी मंत्री गिरीश महाजन यांना धारेवर धरून संताप व्यक्त केला. यावेळी या महिलेला दमदाटी करण्यात आल्याचे व्हिडिओ समाज माध्यमातून दिसत आहेत. या महिलेचे चारित्र्यहनन करण्याचे काम भाजपाचा आयटी सेल व भाजपा समर्थक करत आहेत. हा भाजपाचा महिलांबद्दलचा दृष्टीकोन आहे, आणि हे महिला आरक्षणावर मोर्चा काढत आहेत, हा भाजपाचा दुटप्पीपणा आहे, असेही सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.JS/ML/MS