कुष्ठरोगावर उपचार घेणाऱ्या वयोवृद्ध रुग्णांच्या उपचारांसाठी विशेष तज्ज्ञ डॉक्टर नेमावेत, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा
मुंबई, दि २४
ॲक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय येथे दीर्घकाळ उपचार घेणाऱ्या वयोवृद्ध रुग्णांच्या सहव्याधींवर उपचार व्हावेत, यादृष्टीने विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी रूग्णालय प्रशासनास दिले. ॲक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय येथे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा आज (दिनांक २४ एप्रिल २०२६) यांनी आकस्मिक भेट दिली. पुरातन वास्तू असलेेल्या रुग्णालय इमारतीच्या अंतर्गत कक्षांची कामे आणि आंतररुग्ण विभागाच्या दुरूस्ती कामांची पाहणीदेखील त्यांनी आज केली. रुग्णालय परिसराच्या आवारातील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयाच्या विद्यार्थी वसतिगृह इमारतीच्या कामाचा आढावादेखील त्यांनी आजच्या भेटीदरम्यान घेतला.
ॲक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालयाची इमारत १३ एकर आवारात उभारण्यात आली आहे. याठिकाणी प्रशासकीय इमारत, बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, स्मशानभूमी, मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था आदी कार्यालये आहेत. आजच्या भेटीदरम्यान कर्मचारी निवासस्थान, संग्रहालय याठिकाणीही डॉ. विपिन शर्मा यांनी भेट दिली. त्याशिवाय रुग्णालय परिसरातील सेठ गो.सुं. वैद्यकीय महाविद्यालय आणि राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयाच्या ८०० विद्यार्थी क्षमतेच्या वसतिगृहाच्या इमारतीच्या कामाची पाहणीदेखील त्यांनी यावेळी केली. विद्यार्थ्यांच्या सुविधेच्या अनुषंगाने विद्युत जोडणीशी संबंधित कामे वेगाने करण्याचे निर्देशही त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले.
सद्यस्थितीला ॲक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालय येथे ५५ रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांमध्ये ३० पुरूष आणि २५ महिला उपचार घेत आहेत. रूग्ण कक्षाच्या ठिकाणी डॉ. विपिन शर्मा यांनी भेट देऊन रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. वृद्धत्वामुळे रुग्णांना भेडसावणाऱ्या सहव्याधींवर उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याच्या सूचनाही त्यांनी रूग्णालय प्रशासनाला दिल्या.
रुग्णालय परिसरात आरोग्य पायाभूत सुविधा कक्षामार्फत पुरातन वास्तू विषयक संबंधित कामांचा आढावा डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला. तसेच बाह्यरूग्ण विभागाच्या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सुविधांचीही पाहणी केली. सद्यस्थितीला दैनंदिन ६० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी दाखल होतात. गत तीन वर्षांमध्ये १८०० हून अधिक रूग्णांनी बाह्यरूग्ण विभागातील सुविधांचा लाभ घेतला. या रुग्णांपैकी कुष्ठरोगाचे निदान झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रूग्णालय प्रशासनामार्फत रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची माहिती डॉ. विपिन शर्मा यांनी याप्रसंगी घेतली. या भेटीदरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिक्षक डॉ. चंद्रकांत पवार, ॲक्वर्थ महानगरपालिका कुष्ठरोग रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. अमिता पेडणेकर, रुग्णालयाचे उप अधिष्ठाता डॉ. अविनाश खाडे आदी उपस्थित होते.JS/ML/MS