बंजारा टायगर आंदोलन मागे; मागण्यांवर सकारात्मक भूमिका
मुंबई. दि. ९ : बंजारा टायगर संघटनेच्या वतीने राज्यातील बंजारा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले होते. संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृद्धी योजनेअंतर्गत प्रलंबित कामे, निधीवाढ, तसेच तांड्यांच्या मूलभूत सुविधांसंदर्भातील प्रश्न या आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करत ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेण्याची वेळ मागितली. मंत्री गोरे यांनी या मागणीची दखल घेत तात्काळ भेटीसाठी वेळ देत आंदोलकांशी मंत्रालयात चर्चा केली.
यावेळी आंदोलकांच्या सर्व मागण्या शांतपणे आणि सविस्तर ऐकून घेत संबंधित विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. प्रलंबित कामांना गती देणे, मंजूर निधी वेळेत वितरित करणे, तसेच तांड्यांच्या विकासासाठी आवश्यक प्रशासकीय निर्णय लवकर घेण्याबाबत मंत्री महोदयांनी संबंधित विभागांना सूचना करण्याचे आश्वासन दिले. मंत्री गोरे यांनी आंदोलकांना संवादाच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन करत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी मंत्री गोरे यांनी दिले. या सकारात्मक भूमिकेची दखल घेत आंदोलकांनी तात्काळ आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.
संवाद आणि समन्वयाच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याच्या या भूमिकेमुळे तणावपूर्ण परिस्थिती निवळली असून, पुढील कार्यवाहीबाबत प्रशासनाकडून सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा आंदोलकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.ML/ML/MS