मुंबई बसून डॉक्टरांनी केले ओमानमधील महिलेचे रोबोटिक किडनी ऑपरेशन
मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाने जागतिक आरोग्य दिन २०२६ रोजी एक मोठे यश संपादन केले आहे. रुग्णालयाचे डॉक्टर टी. बी. युवराजा यांनी मुंबईत बसून ओमानमधील मस्कत येथील मेडिकल सिटी रुग्णालयात ५५ वर्षीय महिलेचे रोबोटिक किडनी ऑपरेशन केले. ही सीमापार रिमोट रोबोटिक शस्त्रक्रिया भारतातून पहिल्यांदाच करण्यात आल्याचे मानले जात आहे.
ही शस्त्रक्रिया प्रगत ‘मेडबॉट ट्युमाई’ रोबोटिक प्रणाली आणि रिअल-टाइम कनेक्टिव्हिटीद्वारे करण्यात आली. डॉक्टरांनी दूर बसून संपूर्ण ऑपरेशन नियंत्रित केले आणि यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पूर्ण केली. कोकिलाबेन रुग्णालयातील यूरो-ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्जरीचे संचालक डॉ. टी. बी. युवराजा म्हणाले की, आरोग्यसेवेत हा एक मोठा बदल आहे. त्यांच्या मते, आता रुग्णांना चांगल्या उपचारांसाठी दुसऱ्या देशात जाण्याची गरज भासणार नाही, तर डॉक्टरच तंत्रज्ञानाच्या मदतीने रुग्णांपर्यंत पोहोचू शकतील.