सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याची मागणी बेस्ट समितीत चर्चा

 सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याची मागणी बेस्ट समितीत चर्चा

मुंबई, दि ७: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (बेस्ट) मधील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत भाजपचे नगरसेवक सुनील गणाचार्य यांनी ही मागणी मांडली.

बेस्ट उपक्रमाची सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देणे कठीण होत चालले आहे. मोठ्या प्रमाणावर कर्मचारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्याने एकाच वेळी आर्थिक भार वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. यावर उपाय म्हणून सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.
दरम्यान, बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी या संदर्भात नगर विकास विभागाकडे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले असून यावर सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
गेल्या काही वर्षांत बेस्टची आर्थिक घडी ढासळली असून अनुभवी अधिकाऱ्यांची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. वाहतूक, विद्युत पुरवठा आणि प्रशासकीय विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे उपक्रमाच्या कामकाजावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तसेच, मागील पाच वर्षांत बेस्टमध्ये महाव्यवस्थापक पदावर सहा आयएएस अधिकाऱ्यांनी काम केले, मात्र त्यांनी अल्पावधीतच बदली घेतल्याने उपक्रमाला स्थिर नेतृत्व मिळू शकले नाही. परिणामी, बेस्टची घसरण सुरूच राहिल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर अनुभवी, निष्ठावंत आणि उपक्रमाशी बांधिलकी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची गरज अधोरेखित करत सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.JS/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *