बृहन्मुंबई महानगरपालिकेने विकसित केलेला ‘डॅश बोर्ड’ मुंबईकरांसाठी ठरतोय फायदेशीर
मुंबई, दि ७
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई महानगरातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी व्यापक स्वरुपात नियोजन केले जात आहे. मुंबईतील नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये हाती घेतला आहे. त्यामुळे रस्ते प्रवास अधिक सुकर होणार आहे. एकिकडे महानगरपालिका रस्त्यांची कामे करत असताना, दुसरीकडे मुंबईकरांनाही आपल्या परिसरातील माहिती व्हावी यासाठी महानगरपालिकेने रस्त्यांची इत्यंभूत माहिती दर्शविणारी संगणकीय प्रणाली (Real Time Dash Board) विकसित केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील https://roads.mcgm.gov.in/publicdashboard या लिंकवर हा माहितीपूर्ण ‘डॅश बोर्ड’ सर्वांसाठी खुला आहे. विशेष म्हणजे हा ‘डॅश बोर्ड’ प्रत्येक दिवशी अपडेट करण्यात येणार आहे. महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी रस्ते कामांचा सविस्तर आढावा घेतला. रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे विहित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने करण्यात यावीत, असे निर्देश अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत त्यांनी दिले.
या आढावा बैठकीत श्रीमती भिडे यांनी सांगितले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाचा टप्पा १ दिनांक १२ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात यावा. टप्पा २ हा मे २०२७ पर्यंत पूर्ण करावा. यामध्ये कोणत्याही स्वरुपाची मुदतवाढ दिली जाणार नाही. रस्ते गुणवत्तेबाबत अधिक दक्ष राहणे गरजेचे आहे. सध्या सुरू असलेल्या रस्त्यांची कामे दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण होतील, याची दक्षता घ्यावी. पावसाळादरम्यान कोणतेही काम सुरू केले जाणार नाही, याची काळजी घ्यावी. जेणेकरून नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागणार नाही. सिमेंट रस्ता प्रकल्पात पारदर्शकता राहावी, यासाठी महानगरपालिकेने ‘डॅश बोर्ड’ सुरू केला आहे, असे श्रीमती भिडे यांनी सांगितले.
महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या दालनात काल (दिनांक ६ एप्रिल २०२६) रोजी ही आढावा बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) श्री. गिरीश निकम, उप आयुक्त (आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, प्रमुख अभियंता (रस्ते) श्री. मंतय्या स्वामी आदींसह अभियंते उपस्थित होते.
मुंबईतील सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी त्यात पारदर्शकता असणे गरजेचे आहे. त्यामुळे महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी या प्रकल्पाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष दिले आहे. तसेच महानगरपालिकेच्या ‘डॅश बोर्ड’वर माहिती अद्ययावत ठेवावी, असे स्पष्ट निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले आहेत. रस्त्यांची कामे करताना नागरिकांची गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घ्या, असेही त्यांनी सांगितले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत २,११८ रस्त्यांचे (लांबी ६९१.०८ किलोमीटर) सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. यापैकी १,१७० रस्त्यांचे (लांबी ३१६.८४ किलोमीटर) संपूर्ण लांबीचे (End to end) काँक्रिटीकरण (PQC) पूर्ण झाले आहे. तर ५५९ रस्त्यांचे संगमस्थान ते संगमस्थान (junction to junction) (१७१.४० किलोमीटर) सिमेंट काँक्रिटीकरण (PQC) आहे. अशाप्रकारे एकूण ६९१.०८ किलोमीटर पैकी ४८८.२४ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण म्हणजेच ७१ टक्के काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित ३८९ रस्त्यांचे (१०२.०४ किलोमीटर) सिमेंट काँक्रिटीकरण (PQC) लवकरच सुरू करण्यात येणार आहे. अशाप्रकारे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झालेले, प्रगतिपथावर असलेले आणि लवकरच काँक्रिटीकरण सुरू होणाऱ्या रस्त्यांची माहिती महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील रस्तेकामांच्या ‘डॅश बोर्ड’वर स्वतंत्र रकान्यात देण्यात आली आहे.
रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्प अंतर्गत काँक्रिट ओतण्याच्या (PQC) प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती परिमंडळ निहाय (zone), प्रशासकीय विभागनिहाय (ward office) नागरिकांसाठी उपलब्ध आहे. यामुळे नागरिकांना आपल्या परिमंडळातील कोणत्याही विभागातील रस्ता कामाची सद्यस्थिती पाहणे सोपे आणि सुटसुटीत झाले आहे. याबरोबरच नागरिकांना आपल्या परिसरातील ज्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे त्याची लांबी-रुंदी, काम कधी सुरू झाले, कधी पूर्ण होणार, यासोबतच किती टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती उपलब्ध आहे. या ठिकाणी नागरिकांना रस्त्याची सद्यस्थिती दर्शविणारे छायाचित्रेदेखील पाहायला मिळणार आहेत.
महानगरपालिका अधिकारी आणि कंत्राटदाराशी मुंबईकर साधू शकतात संपर्क
आपल्या परिसरातील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम कोणत्या कंत्राटदाराला देण्यात आले आहे, महानगरपालिकेच्या कोणत्या अभियंत्याकडे संबंधित रस्त्याची जबाबदारी आहे, त्या दोघांचे नाव आणि संपर्क क्रमांकासह सविस्तर माहिती ‘डॅश बोर्ड’वर उपलब्ध आहे. त्यामुळे कंत्राटदाराशी आणि जबाबदार महानगरपालिका अधिकाऱ्याशी थेट संवाद साधू शकणार आहेत.
याशिवाय नागरिकांना माहिती हवी असलेल्या रस्त्याच्या कामांची सद्यस्थिती थेट जाणून घ्यावयाची असल्यास डॅश बोर्डच्या होमपेजवर असलेल्या ‘सर्च बार’ मध्ये रस्त्याचे नाव टाकले तरी सविस्तर माहिती पटलावर प्रदर्शित करण्यात येते. इतकेच नव्हे तर नागरिकांना अधिक सोप्या पद्धतीने रस्त्यांची माहिती शोधता यावी यासाठी मुंबईच्या नकाशाद्वारेही सिमेंट काँक्रिटीकरणाची माहिती देण्यात आली आहे.
नागरिकांना तक्रारही करता येणार
आपल्या परिसरात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरण कामांबाबत मुंबईकरांना पारदर्शक माहिती देण्यासह त्यांना रस्त्यांच्या कामांबाबत मत व्यक्त करण्याची संधी देखील या ‘डॅश बोर्ड’वर देण्यात आली आहे. ‘डॅश बोर्ड’च्या होमपेजवरच उजवीकडील रकान्यात नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी सोय उपलब्ध करुन दिली आहे. या ठिकाणी नागरिकांनी ‘क्लिक’ केल्यावर समोर एक अर्ज उपलब्ध होतो. या तक्रार अर्जावर नागरिकांनी आपले नाव (ऐच्छिक), संपर्क क्रमांक (तक्रार सोडविल्यानंतर या क्रमांकावर संदेश प्राप्त होतो) आणि तक्रारीचे स्वरुप सादर करणे गरजेचे आहे. यासोबतच नागरिक तक्रारीसह थेट रस्त्याचे छायाचित्र देखील जोडू शकतात. नागरिकांनी तक्रारीची नोंद केल्यानंतर रस्ते कामांच्या अधिकाऱ्याला त्याबाबत लगेच संदेश त्यांच्या भ्रमणध्वनीवर प्राप्त होतो.
इतर विभागांसह प्राधिकरणांशीही समन्वय
रस्ते कामे पूर्ण करताना महानगरपालिकेचा जल अभियंता विभाग, पर्जन्य जलवाहिन्या विभाग, पाणीपुरवठा प्रकल्प, मलनिःसारण प्रचालन, मलनिःसारण प्रकल्प आदी विविध विभाग आणि उपयोगिता सेवा वाहिन्यांशी संबंधित यंत्रणा जसे की, विद्युत कंपन्या, गॅस वितरण कंपन्या, दूरध्वनी कंपन्या यांच्याससमवेत समन्वय ठेवण्यात आला आहे.
दैनंदिन प्रवासात होणार सुधारणा
मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला आधुनिक, सुरक्षित व सुयोग्य स्वरूप देण्याच्या दृष्टिने रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतील प्रमुख आणि दुय्यम मार्गांवरील वाहतूक अधिक सुरळीत, वेगवान व शिस्तबद्ध होण्यास मदत होणार असून, त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात लक्षणीय सुधारणा होणार आहे. JS/ML/MS