वचनपूर्तीचा ‘महासंग्राम’ यशस्वी! १५ वर्षांच्या वनवासानंतर मीरा-भाईंदरकरांच्या दारी धावली मेट्रो!
मीरा-भाईंदर दि ७ :
गेल्या १५ वर्षांपासून उराशी बाळगलेले स्वप्न, संघर्षाची साथ आणि विकासाची ओढ… अखेर आज तो सुवर्णक्षण उजाडला! मीरा-भाईंदरकरांच्या संयमाची आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या जिद्दीची फलश्रुती झाली असून,दहिसर ते मीरा-भाईंदर (काशिगाव) या मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे दिमाखदार लोकार्पण आज संपन्न झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याने शहराच्या वाहतूक कोंडीतून मुक्तीचा नवा अध्याय लिहिला गेला आहे. याचवेळी प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘स्मार्ट मेट्रो १’ या कॅशलेस कार्डचे अनावरण देखिल करण्यात आले. या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “या स्मार्ट कार्डमुळे मेट्रो तिकिटांसाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगांतून प्रवाशांची सुटका होणार असून, त्यांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होईल. ‘स्मार्ट मेट्रो १’ कार्डमुळे परिवहन क्षेत्रातील सुमारे ८०% व्यवहार कॅशलेस होण्यास मदत होईल, ज्यामुळे आपली परिवहन सेवा खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ आणि डिजिटल बनेल.”
याचवेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना गायमुख ते दहिसर या मेट्रो १० ची निवेदा प्रक्रिया राबवा आणि लवकर हे काम चालू करण्याची विनंती यावेळी केली. या विनंतीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कडून ग्रीन सिग्नल देत याच महिन्यात या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया करण्यात येईल असे आश्वासन मंत्री प्रताप सरनाईक यांना देण्यात आले.
एक झंझावात – प्रताप सरनाईकांचा ‘मेट्रो ते वचन’ प्रवास
ही केवळ एक मेट्रो मार्गिका नाही, तर हा एका लोकप्रतिनिधीने आपल्या जनतेला दिलेल्या शब्दाचा सन्मान आहे. २००९ मध्ये जेव्हा आमदार म्हणून प्रताप सरनाईक यांनी निवडणूक वचननाम्यात ‘मीरा-भाईंदरला मेट्रो आणणार’ असा शब्द दिला होता, तेव्हा अनेकांनी या स्वप्नावर शंका उपस्थित केली होती. परंतु, गेल्या १५ वर्षांत विधानसभा गाजवण्यापासून ते रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यापर्यंत, प्रत्येक टप्प्यावर त्यांनी हा लढा जिवंत ठेवला.
आज जेव्हा त्यांचं हे स्वप्न सत्यात उतरले आहे त्यावेळी भावूक होऊन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “मी माझ्या मतदारांना शब्द दिला होता की, मीरा-भाईंदरचा प्रवास सुसाट केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आज तो शब्द पूर्ण करताना ऊर भरून आलं आहे. हा विजय माझा नसून माझ्या १५ वर्षांच्या संघर्षावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आहे.”
प्रवासाचा नवा वेग, अंधेरी आता हाकेच्या अंतरावर!
आता दहिसर ते काशिगाव दरम्यान मेट्रो धावू लागल्याने अंधेरीपर्यंतचा प्रवास प्रदूषणमुक्त आणि वातानुकूलित होणार आहे. मेट्रो ७ आणि मेट्रो ९ च्या संयुक्त मार्गिकेमुळे गुंदवली ते काशिगाव असा थेट १९.७९ किमी लांबीचा मार्ग प्रवाशांसाठी खुला झाला आहे.
प्रवासाचे वेळापत्रक आणि वैशिष्ट्ये:
पहिली गाडी: पहाटे ५:५० वाजता.
शेवटची गाडी: रात्री ११:०० वाजता.
वारंवारता: गर्दीच्या वेळी दर ५-६ मिनिटांनी, तर इतर वेळी ८-१० मिनिटांनी.
फेऱ्या: आठवड्याचे दिवस (२७६),
शनिवार (२२३), रविवार (२०५).
विकासाची गुढी आणि जल्लोष
२०१८ मध्ये मंजुरी, २०१९ मध्ये प्रत्यक्ष कामाची सुरुवात आणि एप्रिल २०२६ मध्ये पहिल्या टप्प्याची पूर्णता… हा प्रवास आव्हानांचा होता, पण एमएमआरडीए आणि राज्य सरकारच्या इच्छाशक्तीमुळे आज मीरा-भाईंदरची प्रगती ‘हायस्पीड’ झाली आहे. या लोकार्पण सोहळ्याला आमदार नरेंद्र मेहता, एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी आणि हजारो शिवसैनिकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि मेट्रोच्या रूपाने मिळालेल्या नव्या ओळखीचा अभिमान ओसंडून वाहत होता.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली भावना व्यक्त करत म्हणतात की, “मीरा-भाईंदरची वाढती लोकसंख्या लक्षात घेता मेट्रो ही इथली गरज होती. मेट्रो ९ मुळे मुंबई आणि उपनगरातील अंतर आता पुसले गेले आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, याचे हे जिवंत उदाहरण आहे. हा प्रकल्प आधुनिक महाराष्ट्राच्या प्रवासाची नवी ओळख ठरेल. पुढच्या तीन ते चार वर्षात दिल्ली प्रमाणे मेट्रोचे जाळे आपल्या येथे सुरू व्हावे हा आमचा प्रयत्न आहे. याचसोबत सांगताना आनंद होत आहे की आपण देशात ऑपरेशनल मेट्रोमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आलो आहोत. दिल्लीनंतर आता मुंबई हे दुसऱ्या क्रमांकाचे मेट्रो म्हणून ओळखले जाणार आहे.”
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, “प्रताप सरनाईक यांनी या मेट्रोसाठी विधानसभेत जो संघर्ष केला, तो मी जवळून पाहिला आहे. आज त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरताना पाहून समाधान वाटतेय. इथल्या ५० हजार कष्टकरी प्रवाशांचा प्रवास आता प्रदूषणमुक्त आणि सन्मानाचा होणार आहे. हे ‘गतिमान सरकार’ सर्वसामान्यांच्या हितासाठी सदैव तत्पर आहे.”
या उद्घाटन समारंभाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुंबई महापौर रितू तावडे, मुंबई उपमहापौर संजय घाडी , मीरा -भाईंदर महापौर डिंपल मेहता, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, आमदार संजय उपाध्याय, प्रवीण दरेकर, प्रकाश सुर्वे, आमदार नरेंद्र मेहता आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि MMRDA चे प्रमुख अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.ML/ML/MS