नाशिक महापालिकेला NGT चा झटका, नाशिकमध्ये वृक्षतोडीला ब्रेक
नाशिक दि ७ : नाशिकमध्ये होऊ घातलेल्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरु आहेत. त्यामुळे केवळ तपोवनच नाही तर शहरातील सर्वच भागातील झाडे महापालिकेकडून तोडली जात आहे. झाडे तोडण्याला पर्यावरणप्रेमींनी मात्र कडाडून विरोध दर्शविला आहे. दरम्यान, या वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींनी राष्ट्रीय हरित लवादाकडे (NGT) याचिका दाखल केली होती. पर्यावरण प्रेमींच्या याचिकेला मोठं यश आलं आहे.
या याचिकेवर आज सुनावणी झाली असता हरित लवादाने वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे. केवळ तपोवन नाही तर शहरातील सर्वच भागातील वृक्षतोडीला लवादाने २८ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. तसेच यासंदर्भात नाशिक महापालिका प्रशासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश हरित लवादाने दिले आहेत. हरित लवादाने (National Green Tribunal) दिलेल्या या निर्णयामुळे वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमींना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. तसेच या निर्णयामुळे महापालिका प्रशासनाला २८ एप्रिलपर्यंत नाशिक शहरातील कुठलीही झाडे तोडता येणार नाहीत.
नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात रस्त्यांच्या कामांच्या रुंदीकरणासाठी झाडे तोडली गेली. शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेली जुनी झाडे तोडण्यात आली. या झाडांच्या कत्तीलमुळे नागरिक व पर्यावरणप्रेमींना अश्रू अनावर झाले. हा निसर्गवारसा वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी झाडावर चढून तसेच झाडाखाली बसून आंदोलन केलं. पण रस्त्याच्या रुंदीकरण कामासाठी ही झाडे तोडणे क्रमप्राप्त असल्याचं म्हणत बंदोबस्तात झाडे तोडली गेली. नागरिक व वृक्षप्रेमींनी या वृक्षतोडीचा निषेध नोंदवला. स्थानिकांच्या मते, या झाडांमुळे अपघात होत होते आणि अनेकांचा बळी गेला होता. त्यामुळे झाडे हटवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र दुसरीकडे पर्यावरणप्रेमींनी वृक्षतोडीविरोधात आंदोलन केलं.ML/ML/MS