MPSC च्या उत्तरपत्रिकेत मोठा बदल
मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या परीक्षेसाठीच्या उत्तरपत्रिकेत काही महत्त्वपूर्ण बदल केले असून उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन, अवैध उत्तरपत्रिकांसंदर्भातही काही बदल करण्यात आले आहेत. नव्या कार्यपद्धतीची अंमलबजावणी १ मार्च २०२६पासून घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांसाठी लागू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना वयक्तिक खात्यावर ही उत्तरपत्रिका पाठवण्यात आली असून ती पाहणे अनिवार्य राहणार आहे. यावरूनच विद्यार्थ्यांना पुढीच प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांचा सराव करणे सोपे जाणार आहे.
MPSC ने या संदर्भात परिपत्रकाद्वारे माहिती दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरती प्रक्रियांमध्ये कालसुसंगत अद्ययावतीकरण, नाविण्यपूर्णता आणण्याच्या धोरणाचा भाग म्हणून विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या परीक्षेकरीता वापरण्यात येणारी उत्तरपत्रिका अधिक निर्दोष करण्याच्या हेतूने सुधारित करण्यात येत आहेत. सुधारित उत्तरपत्रिका आयोगाच्या प्रचलित धोरणानुसार दोन प्रतीमध्येच (कार्बनलेस) असणार आहेत. परीक्षेनंतर उत्तरपत्रिकेची मूळ प्रत आयोगाकडे जमा करावयाची आहे, तर दुय्यम प्रत उमेदवारांना सोबत घेऊन जाण्याची मुभा आहे.
उत्तरपत्रिकेच्या नमुन्यामध्ये, तसैच वर्तुळ छायांकित करण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत. त्यानुसार सुधारित उत्तरपत्रिकेची मूळ प्रत दोन भागात असणार आहे. भाग-१ केवळ उमेदवारांना उत्तरे नमूद करण्यासाठी आहे, तर भाग-२ मध्ये परीक्षेचे नाव, उमेदवाराचा बैठक क्रमांक, विषय संकेतांक, प्रश्नपत्रिका क्रमांक, उमेदवाराची व समवेक्षकाची स्वाक्षरी, इत्यादी वैयक्तिक तपशील नमूद करता येईल.
उत्तरपत्रिकेमधील सुधारणेसह उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार पाचपैकी एकही पर्याय छायांकित न करणे, एकापेक्षा जास्त वर्तुळे छायांकित करणे किंवा तसा प्रयत्न करणे, उत्तरामध्ये दुरुस्ती करणे किंवा तसा प्रयत्न करणे, उत्तरपत्रिकेमध्ये सोडविलेले प्रत्येक चुकीचे उत्तर अशा कारणांसाठी प्रत्येक प्रश्नाकरिता २५ टक्के किंवा १/४ गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील. नन्या कार्यपध्दतीचा अवलंब करताना एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात आली, तरी ती अपूर्णांकातच राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
SL/ML/SL