वृत्तपत्रांमध्ये बातमीची खातरजमा करणारी यंत्रणा हवी!
ठाणे दि ६ : “भारत” हे नाव ज्या भूमीतून आले, त्या मुंबईतील सिद्धिविनायक महागणपतीच्या टिटवाळा शहरातून रविवारी दैनिक ‘जन सम्राट टाईम्स’चे दिमाखदार प्रकाशन झाले. राज्याचे पाणीपुरवठा व ग्राम स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन पार पडले. तत्पूर्वी, मंत्री महोदयांच्या हस्ते ‘जन सम्राट टाईम्स’ कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, एक बातमी क्लिक करून त्यांनी ‘जन सम्राट टाईम्स’ वेबसाईटही खुली केली.
याप्रसंगी झालेल्या जाहीर सभेत पाटील यांनी, “वृत्तपत्रांमध्ये बातमीची खातरजमा करणारी यंत्रणा हवी,” अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘जन सम्राट टाईम्स’चे संपादक मुकुंदराव शामराव नंन्नवरे यांच्यासाठी गुलाबभाऊंनी टिटवाळावासियांना भावनिक आवाहन केले की, “माझा मुकुंद मी तुम्हाला सोपविला आहे, त्याला साथ-पाठबळ द्या!” संघर्षातून वर आलेला एक तळमळीचा कार्यकर्ता, प्रामाणिक पत्रकाराच्या धडपडीचे कौतुक करत पाटील यांनी आगामी वाटचालीस हृदय शुभेच्छा दिल्या.
टिटवाळा पश्चिमेतील सिद्धेश्वर हाईट्स मैदानावर झालेल्या प्रकाशन सोहळ्यात ज्येष्ठ आंबेडकरी नेते तानसेनभाई नन्नवरे, आरपीआय आठवले गटाचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे, राजनैतिक अधिकारी देवेंद्र साळी, भीम आर्मीचे नेते राजू झनके, तळोजा एमआयडीसीतील साई सिक्युरिटी सर्व्हिसेसचे राजेंद्र पाटील, नगरसेवक बंदेश जाधव, नगरसेविका तेजश्रीताई गायकवाड, जळगाव जि.प. सदस्य पवन सोनवणे, धरणगाव पं.स. समिती माजी सभापती सचिन पवार व अनिल पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
‘जन सम्राट टाईम्स’ समाज घडविणारी पत्रकारिता करेल
यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, “माध्यमांनी बातम्या जपून आणि खात्री करूनच द्यायला हव्यात. जे आहे, जसे घडले, तसेच वृत्त द्यायला हवे. बातम्या ट्विस्ट करून, पदरचे घुसडून किंवा ठराविक मुद्दाच प्रस्तुत करून बातमी द्यायला नको. त्यासाठी वृत्तपत्र कार्यालयात वार्ताहरांच्या बातम्यांची खात्री करणारी यंत्रणा असायला हवी.” जन सम्राट टाईम्स निश्चितच योग्य पद्धतीने, समाज घडविणारी पत्रकारिता करेल, असा विश्वासही मंत्री महोदयांनी व्यक्त केला.
ध्येयवेड्याने समजावूनही ऐकले नाही
आजच्या काळात वृत्तपत्र चालवणे अतिशय कठीण झाले आहे, असे सांगून गुलाबराव पाटील म्हणाले की, “आम्ही मुकुंदला किती समजावून सांगितले, की पेपर सुरू करण्याचा वेडेपणा करू नको, पण त्याने पक्के मनाशी ठरविलेले असल्याने त्याने ऐकले नाही. एका ध्येयवादाने झपाटून त्याने आता हा नवीन प्रवास सुरू केला आहे. आमचे 12 वर्षांचे स्नेहबंध आहेत. या कार्यक्रमासाठी मतदार संघात “एसआरआर”साठी 5 आमदार आलेले असूनही मला 400 किलोमीटर प्रवास करून यावेच लागले. मला लोक प्रेमाने “भाऊ” म्हणतात. हे नाव उलटे केले की “उभा” होते. एक भाऊ म्हणून मी पूर्णतः मुकुंदच्या पाठीशी उभा आहे. पुढच्या वर्धापनदिनी “जन सम्राट टाईम्स”चा भव्य कार्यक्रम कल्याणमध्ये बंदिस्त सभागृहात होईल,” अशा शुभेच्छा गुलाबभाऊंनी दिल्या.
चळवळीच्या, सामाजिक बातम्यांना माध्यमात योग्य स्थान नाही
संपादक मुकुंदराव शामराव नंन्नवरे यांनी प्रास्ताविकात वृत्तपत्र सुरू करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. गेली 30 वर्षे सामाजिक चळवळ आणि 20 वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत घालवल्यानंतर अलीकडे चळवळीच्या आणि सामाजिक बातम्यांना योग्य स्थान मिळताना दिसत नाही. त्यासाठी पदरमोड करून हा खटाटोप असल्याचे त्यांनी सांगितले. तानसेनभाई नन्नवरे आणि देवेंद्र साळी यांचीही यावेळी भाषणे झाली.ML/ML/MS