भोंदूबाबा अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नाशिक दि १ : कथित भोंदूबाबा अशोक खरात याची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (MCR) सुनावली आहे. अशोक खरात याच्यावर दाखल असलेल्या पहिल्या गुन्ह्यात (FIR क्र. 73/2026) 15 दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. तसेच, दुसऱ्या गुन्ह्यात (FIR क्र. 75/2026) त्याला आरोपी करण्यात आले असून, त्या प्रकरणात उद्या पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
खरातच्या जामिनाचा मार्ग तांत्रिकदृष्ट्या मोकळा झाला असला तरी, त्याच्या
विरोधातील गंभीर आरोप आणि सुरू असलेला तपास लक्षात घेता न्यायालयाचा पुढील निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः दुसऱ्या गुन्ह्यात त्याला कोणती कारवाई किंवा कोठडी मिळणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह पीडित महिलांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून तपास यंत्रणांकडून अधिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
याबाबत माहिती देताना किरण बेंडभर (सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता, नाशिक जिल्हा) म्हणाल्या की, “पहिल्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या गुन्ह्यात त्याला आरोपी करण्यात आले असून उद्या पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.”
ML/ML/SL