महामार्गाच्या खड्ड्यात मगरींचे ‘घर’.
अलिबाग दि ३० – रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील नानोरे येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या विस्तारीकरणाच्या कामादरम्यान एक अनोखी आणि थरारक घटना उघडकीस आली. महामार्गावरील एका मोठ्या खड्ड्यात चक्क मगरींची दोन पिल्ले आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. मात्र, कामगारांच्या समय सूचकतेमुळे आणि वन विभाग आणि रेस्क्यू टीमच्या तत्परतेमुळे या पिल्लांना सुरक्षित नवजीवन मिळाले.
माणगाव बायपास मार्गावर काही वर्षांपूर्वी पुलाच्या फाउंडेशनसाठी मोठे खड्डे खोदण्यात आले होते. काम काही काळ रखडल्याने पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून ते एका छोट्या जलाशयाचे रूप धारण झाले. याच पाण्यात मगरींनी आपला अधिवास निर्माण केला होता.
सध्या महामार्गाचे काम पुन्हा सुरू झाल्यानंतर या खड्ड्यांतील पाणी उपसण्याचे काम सुरू होते.
याच वेळी कामगारांना चिखलात अडकलेली दोन मगरींची पिल्ले दिसून आली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी ही माहिती स्थानिक ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनीही तत्काळ वन विभाग आणि स्थानिक रेस्क्यू टीमला कळवले.
घटनास्थळी दाखल झालेल्या रेस्क्यू टीमने चिखलात अडकलेल्या पिल्लांचा शोध घेत त्यांना सुरक्षित बाहेर काढले. साधारण दोन ते अडीच वर्षांची आणि सुमारे तीन फूट लांबीची ही पिल्ले असल्याचे समोर आले. वन विभागाच्या आवश्यक कायदेशीर प्रक्रिया आणि वैद्यकीय तपासणीनंतर या दोन्ही मगरींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरीत्या सोडण्यात आले आहे.
या घटनेमुळे काही काळ कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, यशस्वी रेस्क्यू ऑपरेशनमुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आली. कामगारांच्या सतर्कतेमुळे संभाव्य धोका टळला आणि दोन निरपराध जीवांचे प्राण वाचले.
महामार्गाचे काम, पावसाचे पाणी आणि निसर्गाचा अनपेक्षित संगम यामुळे घडलेली ही घटना मानव आणि वन्यजीव यांच्यातील सहअस्तित्वाचे जिवंत उदाहरण ठरली आहे. योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला असून रेस्क्यू टीमच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.ML/ML/MS