धारावीतील कुंभारकामाला मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची जोड

 धारावीतील कुंभारकामाला मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची जोड

मुंबई, दि. २८ : धारावीतील कुंभारवाडा परिसरातील ३० महिलांनी पॉटरी प्रशिक्षण कार्यशाळा पूर्ण केल्याबद्दल धारावी सोशल मिशन (DSM) तर्फे त्यांना इलेक्ट्रिक पॉटरी व्हील देऊन गौरव करण्यात आला. पारंपरिक कुंभारकामाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत महिलांसाठी शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.

कुंभारवाडा पारंपरिक मातीच्या भांड्यांसाठी प्रसिद्ध असून महिलांचा सहभाग आतापर्यंत मर्यादित होता. इलेक्ट्रिक चाकामुळे काम अधिक सुलभ, वेगवान व कमी श्रमाचे होणार असून महिलांचा सक्रिय सहभाग वाढेल अशी अपेक्षा आहे. प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी दिवे व विविध भांडी बनविण्याचे कौशल्य आत्मसात केले असून कुटुंबाच्या व्यवसायात हातभार लावण्याची तयारी दर्शवली आहे.

प्रशिक्षक नरसी रामजी वाला यांनी संयम, सराव आणि योग्य तंत्र यांचे महत्त्व अधोरेखित केले. सहभागी महिलांपैकी काहींनी भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली.

धारावी सोशल मिशनने महिलांचे सशक्तीकरण, पारंपरिक कारागिरांना आधुनिक साधनांची जोड आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

दरम्यान, नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (NMDDL) ही विशेष उद्देश कंपनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाची अंमलबजावणी करत असून महाराष्ट्र शासन व अदाणी समूह हे भागधारक आहेत. या प्रकल्पातून दर्जेदार गृहनिर्माण, वाहतूक, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता व डिजिटल सुविधा उपलब्ध करून आधुनिक, सुरक्षित व समावेशक नागरी वसाहती विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *