बेस्ट ची आर्थिक स्थिती मजबूत करा आमदार सुनील शिंदे
मुंबई, दि ९
मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट संदर्भात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर बोलताना, बेस्टचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि मुंबईकरांना परवडणारी, सुरक्षित व विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवा मिळावी यासाठी बेस्टची आर्थिक व प्रशासकीय स्थिती मजबूत करण्याबाबत काही महत्त्वाचे मुद्दे आमदार सुनिल शिंदे यांनी आज सभागृहात मांडले.
सध्या बेस्टच्या ताफ्यातील २६५८ इलेक्ट्रिकल बस या खाजगी कंत्राटदारांच्या आहेत, तर केवळ २४९ बस या बेस्टच्या स्वमालकीच्या आहेत. मुंबईचे पर्यावरण जपणे, आर्थिक तूट कमी करणे आणि केंद्र सरकारच्या धोरणानुसार इलेक्ट्रिक बस ताफ्यात आणण्याचा निर्णय घेतला गेला असला, तरी या बसांमुळे दरवर्षी सुमारे १२०० कोटी रुपयांचा आर्थिक भार बेस्टवर पडत आहे. बेस्ट ही मुंबईकरांना प्रवासी सेवा देणारी संस्था आहे; नफा कमावणे हे तिचे उद्दिष्ट नाही.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे बेस्टला महानगरपालिकेकडून दरवर्षी १००० कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळत आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारनेही बेस्टला भरीव आर्थिक सहाय्य देणे आवश्यक आहे.
आज मुंबईचे पर्यावरण विविध कारणांनी ढासळत आहे. अशा परिस्थितीत बेस्टने स्वमालकीच्या १००० CNG बस का खरेदी करू नयेत? या बससाठी बेस्टकडे आवश्यक असे स्वतःचे इन्फ्रास्ट्रक्चर, डेपो तसेच प्रशिक्षित कर्मचारी आणि अधिकारी उपलब्ध आहेत. या सर्व बाबींचा विचार करून वाढते अपघात आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बेस्टने १००० CNG बस खरेदी कराव्यात आणि बेस्ट सेवा पुन्हा एकदा सक्षमपणे उभी करून मुंबईकरांना दिलासा द्यावा. अशी मागणी आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत मांडली.KK/ML/MS