इराण युद्धामुळे भारतीय कृषी उत्पादन निर्यातीला मोठा फटका

 इराण युद्धामुळे भारतीय कृषी उत्पादन निर्यातीला मोठा फटका

मुंबई, दि. ५ : इराणमधील युद्धपरिस्थितीचा थेट परिणाम भारतीय कृषी उत्पादनांच्या निर्यातीवर होत आहे. विशेषतः चहा, महाराष्ट्रातील हळद आणि बासमती तांदळाची निर्यात जवळजवळ ठप्प झाली आहे. मध्यपूर्वेतील अस्थिरतेमुळे जहाजवाहतूक मार्गांवर अडथळे निर्माण झाले असून निर्यातदारांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. हजारो टन हळद मुंबईच्या जेएनपीटी बंदरात अडकल्याची मोठी बातमी समोर आली आहे.यामुळे सांगलीच्या हळद बाजाराला मोठा फटका बसला आहे. सध्या सुमारे ४ लाख टन बासमती तांदूळ बंदरांवर अडकले आहेत, तर स्थानिक बाजारात दर ५-६% घसरले आहेत.

भारतीय चहा उद्योगाला परदेशी बाजारपेठेत मोठी मागणी असते, परंतु सध्या निर्यात थांबल्याने असंख्य चहा उत्पादक आणि व्यापाऱ्यांवर संकट आले आहे. महाराष्ट्रातील हळदीचे उत्पादन जगभर प्रसिद्ध आहे, मात्र युद्धामुळे वाहतूक आणि व्यापार करारांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळत नाही. भारत दरवर्षी सुमारे १,२०० दशलक्ष किलो चहा उत्पादन करतो, त्यापैकी मोठा हिस्सा निर्यात होतो.

इराण हा भारतीय चहाचा महत्त्वाचा ग्राहक देश होता.

युद्धामुळे निर्यात करार रद्द झाले असून, चहा निर्यातदारांना मोठा फटका बसला आहे.

अंदाजे २०-२५% निर्यात घटली आहे.

बासमती तांदळाच्या निर्यातीवरही गंभीर परिणाम झाला आहे. इराण हा भारताचा महत्त्वाचा ग्राहक देश असून तिथे मागणी मोठ्या प्रमाणात असते. परंतु युद्धामुळे आयात-निर्यात व्यवहार थांबले आहेत. यामुळे पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांवरही आर्थिक संकट ओढवले आहे.

तज्ज्ञांच्या मते, जर ही परिस्थिती दीर्घकाळ टिकली तर भारतीय कृषी क्षेत्राला मोठा फटका बसू शकतो. शेतकऱ्यांना तातडीने पर्यायी बाजारपेठा शोधण्याची गरज आहे. सरकारनेही निर्यातदारांना आर्थिक मदत आणि नवीन व्यापार मार्ग उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *