नागपूर कारखान्यातील स्फ़ोटावरून विधानसभेत गदारोळ ; विरोधकांचा सभात्याग
मुंबई : दि. ५ : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपनीत स्फोट होवून १८ कामगारांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद गुरुवारी विधानसभेत उमटल्याचे दिसून आले. या स्फोट प्रकरणी राज्य सरकारने सदर कंपनी बंद केली आहे. या प्रकरणात २१ जणांवर गुन्हे दाखल केले असून संबंधित कारखान्याचा मालक तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी विधानसभेत दिली. यापुढे कामगारांच्या सुरक्षेत त्रुटी आढळल्यास थेट कंपनी बंद करण्याचे अधिकार नवीन कामगार कायद्यान्वये राज्य सरकारला प्राप्त होणार आहेत, त्यानुसार या प्रकरणी कामगार विभागातील अधिकाऱ्यांचीही चौकशी होईल, असे फुंडकर यांनी सांगितले मात्र या उत्तरावर समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला.
विधानसभेत या घटनेवर लक्षवेधीच्या माध्यमातून चर्चा झाली. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या दुर्घटनेबाबत प्रशासनाकडून कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. तसेच या घटनेला जबाबदार असलेल्या कामगार विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा सवाल करत त्यांच्या निलंबनाची मागणी केली. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी पेसोचे मुख्यालय नागपूरात आहे. तिकडे अवघे दोन कर्मचारी आहेत. त्या अधीकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर 302 चे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. तर या दुर्घटनेत अनेक कामगारांचा मृत्यू झाला असून काही जखमींची प्रकृती अजूनही गंभीर आहेत . त्यामुळे ही केवळ दुर्घटना नसून निष्काळजीपणामुळे घडलेले हत्याकांड असल्याचा आरोप काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला.
त्यावर कामगार राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी या घटनेप्रकरणी चौकशी अहवाल आल्यानंतर या घटनेतील दोषीवर कारवाई करण्याचे उत्तर दिले मात्र या उत्तरावर समाधान न झाल्याने अखेर कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी या लक्षवेधीवर उत्तर देऊन विरोधकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. फुंडकर म्हणाले, ही घटना अत्यंत गंभीर असून सरकारने तातडीने कारवाई केली आहे. या प्रकरणात कारखान्याच्या मालकासह एकूण २१ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोष निश्चित करण्यासाठी तपास सुरू असून, तपासात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच राज्य सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांचीही जबाबदारी तपासली जात असून, आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणताही अधिकारी दोषी आढळल्यास त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनीही या भागात अनेक स्फोटक कंपन्या कार्यरत असून वारंवार दुर्घटना घडत असल्याचे सांगितले. औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाने यापूर्वी केलेल्या तपासणीनंतरही अशी दुर्घटना कशी घडली, याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तर भाजप आमदार चरणसिंग ठाकूर यांनी या भागात यापूर्वीही अनेकदा स्फोट होऊन मोठी जीवितहानी झाल्याचे सांगत कारखान्यांमध्ये सुरक्षा उपाययोजना कडक करण्याची मागणी केली. कामगारांच्या सुरक्षेसाठी ठोस धोरण आखण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावर मंत्री फुंडकर यांनी सांगितले की, स्फोटक कारखान्यांमधील सुरक्षा नियम आणि देखरेख अधिक कडक करण्यासाठी राज्य सरकार लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार आहे.
सदर घटनेचे गांर्भीय लक्षात घेवून या घटनेची चौकशी सुरू आहे. यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर ३०२ चे गुन्हे दाखल करू. शासन या प्रकरणात संवेदनशील असून या प्रकरणात दोषींची गय केली जाणार नाही. तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सर्व संबंधित विभाग आणि कामगार संघटनांशी चर्चा करून उपाययोजना करण्यात येतील असे फुंडकर यांनी स्पष्ट केले.ML/ML/MS