मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जागतिक श्रवण दिन उत्साहात साजरा

 मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जागतिक श्रवण दिन उत्साहात साजरा

पुणे, दि ५- मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जागतिक श्रवण दिन (वर्ल्ड हिअरिंग डे) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नामवंत उद्योजक तेजस सोनिगरा, नगरसेवक अनंत कोऱ्हाळे तसेच रुग्णालयाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अविनाश वाचासुंदर, विश्वस्त व ईएनटी सर्जन डॉ. अक्षय वाचासुंदर आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी बोलताना डॉ. अक्षय वाचासुंदर यांनी सांगितले की, जन्मतः कर्णबधिर असलेल्या मुलांचे बहिरेपण योग्य उपचारांमुळे दूर होऊ शकते आणि त्यांना बोलताही येऊ शकते. यासाठी अशा मुलांचे योग्य वेळी निदान होणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य वेळी कॉक्लियर इम्प्लांट ऑपरेशन करून त्यानंतर त्यांना वाचा-भाषा प्रशिक्षण दिल्यास ही मुले सामान्य मुलांप्रमाणेच बोलू शकतात आणि नॉर्मल शाळांमध्ये शिक्षण घेऊन बहिरेपणाच्या व्यंगत्वावर पूर्णपणे मात करू शकतात.

मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत अशा सुमारे साडेतीनशे मुलांचे कॉक्लियर इम्प्लांट ऑपरेशन यशस्वीरित्या करण्यात आले आहे. तसेच हॉस्पिटलमधील वाचा-भाषा प्रशिक्षण केंद्रामार्फत या मुलांना बोलण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणामुळे सर्व मुले सामान्य शाळांमध्ये शिक्षण घेत असून योग्य प्रगती करत आहेत.

डॉ. अक्षय वाचासुंदर यांनी सांगितले की, हा प्रकल्प जीवन घडविणारा असून यामुळे मुलांचा विकास, कुटुंबाचा विकास आणि समाजाचा विकास घडतो. या उपक्रमाची सुरुवात रक्षा देशपांडे आणि डॉ. अविनाश वाचासुंदर (ईएनटी सर्जन) यांनी केली आहे.

कार्यक्रमात उपस्थित सर्व पालकांना मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही सांगण्यात आले.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *