फुलांची होळी उपक्रमात वापरलेल्या फुलांचा सेंद्रिय खत निर्मितीसाठी उपयोग करणार.

 फुलांची होळी उपक्रमात वापरलेल्या फुलांचा सेंद्रिय खत निर्मितीसाठी उपयोग करणार.

मुंबई, दि ४

होळी व धुळवड/रंगपंचमी हे सण आनंदात साजरे करावेत आणि त्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे सामाजिक कर्तव्यही सर्वांनी पार पाडावे, त्यासाठी मुंबईची महापौर या नात्याने स्वतः कृतीतून संदेश द्यावा, या उद्देशाने ‘फुलांची होळी’ हा पर्यावरणपूरक उपक्रम आयोजित केला, असे उद्गार मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी काढले. या उपक्रमात वापरात आलेल्या फुलांचा सेंद्रिय खत निर्मितीसाठी उपयोग करण्यात येणार असून हरित मुंबईसाठी नागरिकांनी हातभार लावावा, असे आवाहन देखील महापौरांनी या निमित्ताने केले आहे.

मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या पुढाकाराने घाटकोपर (पूर्व) येथे राजावाडी उद्यानात ‘फुलांची होळी’ हा पर्यावरणपूरक उपक्रम आज (दिनांक ३ मार्च २०२६) सकाळी आयोजित करण्यात आला. महापौर श्रीमती रितू तावडे, आमदार श्री. पराग शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि स्थानिक नागरिकांच्या उत्साहात हा उपक्रम पार पडला.

रासायनिक रंगांचा वापर टाळून, पाण्याचा अपव्यय न करता, फुलांच्या पाकळ्यांनी धूलिवंदन सण साजरा करणे, पर्यायाने नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमानंतर संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली. फुलांची होळी उपक्रमात वापरलेली फुले संकलित करण्यात आली. ही फुले सेंद्रिय खतनिर्मितीसाठी वापरण्यात येणार आहेत. यामुळे फुलांचे रूपांतर उपयुक्त खतामध्ये होऊन स्वच्छ व हरित मुंबईच्या संकल्पनेला हातभार लागणार आहे.

यावेळी महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या की, होलिका दहन व धुळवड/रंगपंचमी हे सण जबाबदारीने साजरे करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. झाडांची तोड न करता, कोरड्या लाकडाचा वापर करून पारंपरिक पद्धतीने होलिका दहन करावे, तसेच प्लास्टिक, टायर, रबर व रसायनयुक्त रंगवलेले साहित्य जाळू नये. धुळवडीच्या दिवशी पाण्याचा अपव्यय टाळावा, पर्यावरणपूरक नैसर्गिक व सेंद्रिय रंगांचा वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले होते. त्याही पुढे जाऊन फुलांची होळी यासारखा पर्यावरणपूरक आणि आपल्या संस्कृतीचा परिचय देणारा उपक्रम मी स्वतः मुंबईची महापौर या नात्याने राबवला. त्यातून एक कृतिशील संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, असे महापौर श्रीमती रितू तावडे यांनी नमूद केले.

आमदार श्री. पराग शाह म्हणाले की, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी फुलांची होळी उपक्रम राबवून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश स्वतःपासून दिला आहे. सर्व नागरिकांनी सण साजरे करताना पर्यावरणाचे भान देखील जपावे. ध्वनी प्रदूषण टाळावे, रुग्णालये, निवासी व संवेदनशील भागात आवाजाची पातळी मर्यादेत ठेवावी. ‘फुलांची होळी’ हा उपक्रम त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे ते म्हणाले. फक्त एवढ्यावरच न थांबता, या फुलांचे सेंद्रिय खत तयार करून वापरात येणार असल्याने स्वच्छ, हरित व निरोगी मुंबईसाठी हातभार लागणार आहे. अशा उपक्रमांचे अनुकरण करून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील श्री. शाह यांनी केले.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *