मानखुर्द-शिवाजीनगरमधील विषारी हवेमुळे जनजीवन विस्कळीत
मुंबई: मानखुर्द-शिवाजीनगर आणि मुंबईतील विषारी हवेला कचऱ्याचे ढीग, डंपिंग ग्राउंड आणि बायो-वेस्ट कंपन्यांइतकीच सरकारही जबाबदार आहे. सतत वाढणाऱ्या प्रदूषणामुळे येथील रहिवाशांचे सरासरी वय घटून केवळ ३९ वर्षे उरले आहे, तरीही सरकार कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे. सरकारच्या नजरेत गरिबांच्या जिवाची काहीच किंमत नाही का? असा सवाल करत समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आसिम आझमी यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आझमी यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर बॅनर हातात धरून जोरदार निदर्शने केली. सरकार गरीब आणि मागास भागांकडे दुर्लक्ष करत असून मुंबईत पसरणारे प्रदूषणाचे विष रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
ते म्हणाले की, मानखुर्द-शिवाजीनगरमधील विषारी हवेमुळे जनतेच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. वारंवार मागणी करूनही ‘एसएमएस’ (SMS) सारख्या बायो-वेस्ट कंपन्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या कंपन्यांमुळे परिसरात विषारी हवा पसरली असून सर्वसामान्यांना श्वास घेणे कठीण झाले आहे. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून सरकार याप्रकरणी दिरंगाई आणि हलगर्जीपणा करत आहे.
मानखुर्द-शिवाजीनगरसह संपूर्ण मुंबईत विषारी हवा पसरवून पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध सरकारने तातडीने आणि कठोर पावले उचलावीत, अशी मागणी आझमी यांनी यावेळी केली.KK/ML/MS