कोकणातील आंबा बागायतदारांना तातडीने नुकसान भरपाई द्या – आमदार सुनिल शिंदे यांची लक्षवेधीद्वारे मागणी

 कोकणातील आंबा बागायतदारांना तातडीने नुकसान भरपाई द्या – आमदार सुनिल शिंदे यांची लक्षवेधीद्वारे मागणी

मुंबई, दि २४
कोकणच्या सुप्रसिद्ध हापूस आंबा ला राज्य फळाचा दर्जा देण्यात आला आहे, ही अभिमानाची बाब असली तरी शासनाच्या विद्यमान नियमांनुसार २२ नाशवंत फळांना हमीभाव देता येत नाही आणि त्या यादीत हापूस आंब्याचा समावेश करण्यात आला आहे. हा निकष आंबा पिकाला लागू करणे अन्यायकारक असून आंबा पिकाला हमीभाव देण्यासाठी शासनाने तातडीने विशेष निर्णय घ्यावा अशी लक्षवेधी विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी सभागृहात मांडली.
ते पुढे म्हणाले आंबा बागायतदारांना देण्यात आलेली ८६.७२ कोटी रुपयांची नुकसानभरपाई अत्यंत तुटपुंजी आहे. वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर या मदतीत भरीव वाढ करून बागायतदारांना दिलासा देणे गरजेचे आहे.
नुकसान झालेल्या अनेक आंबा बागायतदारांचे अद्याप पंचनामे झालेले नाहीत. अशा सर्व शेतकऱ्यांचे तातडीने पुनर्पंचनामे करून त्यावर त्वरित निर्णय घ्यावा.
यासोबतच सध्या आंबा पिकासाठी असलेली ३ लाख रुपयांची पीककर्ज मर्यादा अपुरी असून ती वाढवून किमान ६ लाख रुपये करण्यात यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य आर्थिक आधार मिळेल.
अवकाळी पाऊस, तीव्र हवामान बदल, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव, खते-औषधांच्या दरातील अनियंत्रित वाढ, मजुरी खर्चातील मोठी वाढ आणि बाजारभावातील प्रचंड चढ-उतार या सर्वांनी आंबा बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. अनेक आंबा बागायतदारांनी वार्षिक कराराने बागा घेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली; मात्र उत्पादन आणि उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नसल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तर केलेला खर्चही निघत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
आंबा हा कोकणच्या केवळ कृषी उत्पादनापुरता मर्यादित नसून तो या प्रदेशाच्या ओळखीचा आणि अर्थव्यवस्थेचा कणा आहे. हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह, ग्रामीण उद्योगांची साखळी आणि स्थानिक बाजारपेठांची उलाढाल या सर्वांचा श्वास आंबा पिकावर अवलंबून आहे.

मात्र सध्याच्या विपरीत परिस्थितीमुळे आंबा उत्पादक शेतकरी बँकांच्या कर्जबाजारीपणात अडकले असून मानसिक व आर्थिक तणावाखाली जीवन जगत आहेत, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. आंबा पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता आहे. त्यातच नुकसानग्रस्त आंबा बागायतदारांना नुकसानभरपाई देण्याबाबत शासनाकडून होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष संतापजनक आहे.
कोकणातील हजारो आंबा बागायतदारांना तातडीने दिलासा देण्यासाठी आंब्याला हमीभाव जाहीर करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित व पुरेशी नुकसानभरपाई द्यावी. शासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करणे अत्यावश्यक आहे, अन्यथा कोकणातील आंबा अर्थव्यवस्था गंभीर संकटात सापडेल.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *