भविष्यात राज्याचे नेतृत्व करू शकणारा नेता गमावल्याची मुख्यमंत्र्यांची भावना

 भविष्यात राज्याचे नेतृत्व करू शकणारा नेता गमावल्याची मुख्यमंत्र्यांची भावना

मुंबई दि. २३ : भविष्यात होऊ घातलेला राज्याचा मुख्यमंत्री अजिदादांच्या रूपाने आपण गमावला आहे, कितीही काळ गेला तरीही दादांच्या जाण्याचं दुःख कमी होऊ शकत नाही अशी शोक भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाबद्दल त्यांनी सभागृहात शोक प्रस्ताव मांडला त्यावेळी ते बोलत होते.

राजकीय क्षेत्रात स्थिरावलेल्या आणि भविष्यात मोठी इनिंग खेळण्याची अपेक्षा असतानाच पहिल्यांदा जीवनाचे टायमिंग चुकवणाऱ्या दादांच्या जाण्यानं पोकळी नेमकी कशी असते ते ठळकपणे दिसून येत आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
शेतकऱ्यांचा कळवळा असणारा,शेतीची पूर्ण माहिती असणारे मातीतील नेतृत्व ,अनेकांचा आधारवड , शब्दाला जागणारा नेता, कामात झोकून देणारा, राजकीय परिणामांची परवा न करता निर्णय घेणारा नेता अशा वर्णन फडणवीस यांनी यावेळी केलं.

सहकार,शिक्षण, उद्योग यासोबतच साहित्य क्षेत्रातही दादांना रुची होती, मंत्रिमंडळ बैठकीत प्रत्येक विषयाचा परिपूर्ण अभ्यास करून ते यायचे, मंत्रालयात सगळ्यात आधी येऊन वक्तशीरपणा जपणारा नेता, सगळ्या गोष्टी नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचा कटाक्ष असणारा नेता म्हणून दादांची ओळख होती, या मोठ्या संकटाच्या वेळी अत्यंत धीरोदात्तपणे पुढे येऊन सुनेत्रा पवारांनी मोठी जबाबदारी स्वीकारली आहे त्यात त्या पूर्ण यशस्वी होतील असा विश्वास आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

अर्थसंकल्पात खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न दादांचे होते, मुख्यमंत्र्यांना वास्तविकतेचा आरसा दाखवणारा वित्तमंत्री कसा असावा याचा दादा हे उत्तम नमुना होते. आपण एक उत्तम नेता, प्रशासक , मित्र, कुटुंबातील व्यक्ती गमावला आहे.कवी पी. सावळाराम यांच्या कवितेतील एका कडव्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या शोक प्रस्तावाचा शेवट केला.
यानंतर माजी मंत्री सुरूपसिंग नाईक, शालिनीताई पाटील, राज पुरोहित, गंगाधर पटने, निळकंठ फालक , विश्वास नांदेकर, रुपलेखा ढोरे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सगळ्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

या शोक प्रस्तावावर भास्कर जाधव, छगन भुजबळ,विजय वडेट्टीवार, गुलाबराव पाटील,जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुधीर मुनगंटीवार , सुनील प्रभू, हसन मुश्रीफ आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शेवटी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोक भावना व्यक्त केल्या नंतर सभागृहाने दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव मंजूर केला.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *