जागतिक वारसा किल्ल्यांसाठी जतन-संवर्धन आराखडे तयार
मुंबई, दि. 21 : सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने निवडक जागतिक वारसा किल्ल्यांसाठी जतन-संवर्धन आणि पर्यटकांना सोयी उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. या उपक्रमामुळे ऐतिहासिक वारसा सुरक्षित राहण्याबरोबरच पर्यटनालाही चालना मिळणार आहे.
राजगड, सांदेरी, साल्हेर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याची पहिली राजधानी मानला जाणारा राजगड किल्ला सध्या संवर्धनाच्या मोठ्या टप्प्यात आहे. येथे 4.91 कोटी आणि 10.30 कोटी असा एकूण 15.21 कोटी रुपयांचा निधी वापरून तटबंदी, बुरुज आणि गस्ती मार्ग दुरुस्त केले जात आहेत. पायऱ्या व पदपथ बांधणी, मंदिर परिसराची देखभाल आणि इतर वास्तूंचे संरक्षण ही कामेही सुरू आहेत.
समुद्रकिनाऱ्याजवळील खांदेरी किल्ल्यासाठी 7.93 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ल्यासाठीही 7.13 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांमुळे दुर्गभ्रमंती करणाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग आणि आवश्यक सुविधा तयार होतील.
प्रतापगड
सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक प्रतापगड किल्ल्यासाठी 127 कोटी रुपयांचा सर्वसमावेशक आराखडा मंजूर करण्यात आला आहे. जतन-संवर्धनाबरोबरच पर्यटकांसाठी माहिती केंद्र, चालण्याचे मार्ग आणि मूलभूत सुविधा उभारण्यावर भर असेल. यासाठी स्वतंत्र प्रतापगड प्राधिकरण स्थापन करण्यात आले असून तटबंदी दुरुस्ती आणि बुरुजांचे मजबुतीकरण सुरू आहे.
दरम्यान, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने रायगड, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, पन्हाळा, लोहगड आणि शिवनेरी या किल्ल्यांसाठीही संवर्धन आराखडा तयार करून राज्य शासनाकडे सादर केला आहे.
SL/ML/SL