मृत व्यक्तीचा मोबाइल नंबर, सोशल मीडिया अकाऊंट्स वापरल्यास होणार कडक शिक्षा
मुंबई, दि. 18 : काही जण मृत नातेवाईकांचा सोशल मीडिया अकाऊंटसुद्धा स्वत: चालू ठेवतात, त्यात अपडेट्स टाकत असता. परंतु कायदेशीरदृष्ट्या हे अत्यंत चुकीचं आहे. यासाठी तुम्हाला 3 ते 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंडात्मक शिक्षा होऊ शकते.
एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याचा मोबाइल नंबर, व्हॉट्सअॅप अकाऊंट, ईमेल अॅड्रेस, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्रोफाइल्स वापरणं बेकायदेशीर आहे. ही बाब अनेकांना माहीतच नसेल. कुटुंबातील सदस्य अनेकदा सोयीसाठी, भावनिक जोड म्हणून किंवा आर्थिक फायद्यासाठी निधन झालेल्या व्यक्तीचा मोबाइल नंबर किंवा सोशल मीडिया अकाऊंट वापरत राहतात. परंतु यामुळे डेटासंदर्भातील गोपनीयता आणि भारतीय कायद्यांतर्गत येणाऱ्या इतर काही कायद्यांचं उल्लंघन होतं.
मोबाइल नंबर हा कधीच एखाद्या व्यक्तीच्या मालकीचा नसतो. तो एअरटेल, जिओ, बीएसएनएल, व्होडाफोन यांसारख्या मोबाइल ऑपरेटरसोबतच्या सेवा करारांतर्गत भाडेतत्त्वावर दिला जातो.
मृत्यूनंतर फोन नंबर ट्रान्सफर करणं किंवा डिअॅक्टिव्हेट करणं कायदेशीररित्या बंधनकारक आहे. टेलिकॉम नियमांनुसार मोबाइल कनेक्शन ज्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत आहे, त्यानेच ते ऑपरेट केलं पाहिजे.
एखाद्या व्यक्तीचा पर्सनल डेटा त्याच्या मृत्यूनंतरही सुरक्षित राहतो. त्यामुळे कोणत्याही मृत व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाऊंट्सचा, ईमेलचा किंवा व्हॉट्सअॅपचा वापर करणं कायदेशीररित्या चुकीचं आहे.
फेसबुक, इन्स्टाग्राम: निधन झालेल्या व्यक्तीची आठवण म्हणून ते सोशल मीडिया अकाऊंट तसंच ठेवण्याचा किंवा तो डिलिट करण्याचा पर्याय असतो.